नागपूर : महावितरण कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. कोरोना काळात ते तळगळापर्यंत पोहोचून काम करत आहेत. तसेच रात्री-मध्यरात्री पावसामुळे लाईट गेली तर ते मध्यरात्री भर पावसात तांत्रिक अडचणी दूर सारत वीज कनेक्शन पूर्ववत करतात. सर्वसामान्यांच्या घरात वीज पोहोचवण्यासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे. पण काही नागरिकांना या गोष्टींचं गांभीर्य दिसत नाही. नागपुरात एका कुटुंबाने तर वीज कनेक्शन तोडलं म्हणून महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महावितरण कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
संबंधित घटना ही नागपूरच्या भेंडे ले आऊट परिसरातील इंद्रप्रस्थ नगरमध्ये घडली. वीजबिल थकवणाऱ्या कुटुंबाचे वीज कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महावितरणचे तंत्रज्ञ सुखदेव केराम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात सुखदेव प्रचंड रक्तबंबाळ झाले होते.
हल्ला करणाऱ्या कुटुंबाने 5 हजार 155 रुपयांचे वीजबिल थकवलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात विजेचं कनेक्शन कापण्याची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित कारवाईसाठी महावितरणाचं पथक गेलं असताना कुटुंबातील काही सदस्यांनी आधी महावितरणाच्या पथकासोबत शाब्दिक वाद घातला. त्यानंतर त्यांनी थेट केराम यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने प्रहार करत गंभीर जखमी केले.
संबंधित घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. काही महावितरण कर्मचारी आणि संघटनांचे प्रतिनिधी सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संबंधित कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सर्वांची बाजू ऐकून घेत कारवाईचं आश्वासन दिलं. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागपुरात महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, वीजबिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन तोडलं, संतापलेल्या कुटुंबाची महावितरण पथकासोबत आधी हुज्जत, नंतर कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला #Nagpur #Crime pic.twitter.com/ntgxAZ9i8E
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2021
दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात देखील गेल्या आठवड्यात अशीच काहिशी घटना समोर आली होती. विशेष म्हणजे पोलिसानेच महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने विजेचं गेल्या दोन महिन्यांपासून वीजबिल भरलं नव्हतं. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी त्याच्या घराचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने महाविरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.
संबंधित कारवाई करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी मोरेश्वर घावट गेले होते. ज्यावेळी घावट यांनी वीजपुरवठा खंडित केला, त्यावेळी पोलीस कर्मचारी मुकेश जाधव हे घरीच होते. त्यामुळे त्यांनी इमारतीखाली येऊन घावट यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पॅन्ट पकडून ओढत नेलं आणि अर्वाच्य शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, असा घावट यांचा आरोप आहे.
हेही वाचा :
VIDEO : चाकूचा धाक दाखवला, बॅगेतील 20 लाखांची रोख रक्कम लांबवली, नागपुरात भयानक थरार
13 वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या, मुलीचा बाप इतका निर्घृणपणे का वागला?