नागपूर : नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाडी टोल नाक्याजवळ एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक 70 वर्षीय महिलेचं नाव माहेड गिरजाशंकर सिंग असं आहे. तिचा गळा चिरल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येचा अंदाज वर्तवला आहे. पण वृद्धेचा मृतदेह हा संशयास्पदरित्या आढळला आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करणार आहेत.
वाडी टोल नाक्याजवळ एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता महिलेने स्वत: आपल्या गळ्यावर चाकूने वार करुन आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. पण शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर खरं कारण उलगडेल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मृतक महिलेचा मुलगा विपीन सिंग हा हैदराबादला ट्रान्सपोर्टच्या कामानिमित्ताने गेला होता. पण त्याची पत्नी रिंकी आणि लहान मुलगी हे घटनेच्या वेळी फ्लॅटमध्येच उपस्थित होते. ते मंगळवारी (17 ऑगस्ट) सकाळी बाल्कनीत गेले असता संबंधित प्रकार उघड झाला. रिंकूने तातडीने हैदराबादला पतीला फोन केला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
मृतक माहेड सिंग यांना निद्रानाशाचा आजार होता. त्या बऱ्याच दिवसांपासून नैराश्यात होत्या. त्यांना घर स्वच्छ ठेवायला आवडायचं. त्याच निमित्ताने त्या बाल्कनीत गेल्या. मात्र, तिथे त्यांनी गळ्यावर चाकू खोपसून स्वत:चं आयुष्य संपवलं, अशी माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच महिलेने आजाराला कंटाळून आत्महत्या केली की काही घातपात घडला याचा तपास गिट्टीखदान पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालात बरीच माहिती उघड होईल, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हेही वाचा :
ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!