समीर वानखेडे दिल्लीत, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरुन एनसीबीच्या मुख्यालयात चौकशी
एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानचा पिता आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना मिळणार होते, असा आरोप ड्रग पार्टी छाप्यात पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी केला होता
नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे दिल्लीत दाखल झाले आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील धाड प्रकरणी पंचांनीच समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेत वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावणे पाठवले होते. वानखेडेंची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत बोलावल्याची माहिती एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली होती.
Narcotics Control Bureau (NCB) Mumbai Zonal Director Sameer Wankhede reaches NCB office in #Delhi pic.twitter.com/zcSVOD0R5y
— ANI (@ANI) October 26, 2021
काय आहे प्रकरण?
मुंबई-गोवा क्रुझमधील ड्रग्ज पार्टीवर टाकलेल्या छाप्यात पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर साईल यांनी गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानचा पिता आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना मिळणार होते. आर्यन खानला सोडण्यासाठी ही डिलिंग होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने या आरोपाची गंभीर दखल घेतली आहे.
प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रात काय?
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. केपी गोसावी आणि सॅम डिसूझा यांचं फोनवरील संभाषण मी ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा दावा साईल यांनी केला आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला होता.
केपी गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असा सनसनाटी आरोपही प्रभाकर साईल यांनी केला आहे. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं होतं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या:
गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा