Narendra Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 11 वर्षांनी निकाल, 2 आरोपी दोषी
Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. 11 वर्षापूर्वी सकाळच्या सुमारास पुण्यात सकाळच्यावेळी नरेंद्र दाभोलकर यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. पाच आरोपीपैकी 2 आरोपी दोषी इतर 3 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुकत्ता करण्यात आली आहे. विरेंद्र तावडे यांने कटकारस्थान रचल्याचा आरोप होता. वकील संजीव पुनाळेकरने शस्त्र नष्ट करण्याचा आरोपींना सल्ला दिला होता तसच विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. दोषी ठरवण्यात आलेले सचिन अणदुरे आणि शरद कळसकर हे खुनाच्या 302 कलमातंर्गत दोषी ठरले. त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झालीय. 5 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.
सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या केसमध्ये पुणे पोलीस आणि सीबीआय यांनी सुरुवातीपासून वेगवेगळी थिअरी मांडली ही शोकांतिका आहे. ज्या नरेंद्र दाभोलकांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात मोहिम चालवली, त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी प्लॅनचेटचा वापर झाला हे दुर्देव आहे असा त्यांचा खटला लढवणाऱ्या वकिलाने सांगितलं.
‘उच्च न्यायालयात जाणार’
निकालपत्र हाती आल्यानंतर अभ्यास करु व जे निर्दोष ठरलेत, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू असं दाभोलकर यांच्या वकिलाने सांगितलं. दाभोलकर यांच्या कुटुंबाने निकालावर समाधान व्यक्त केलं. पण वरच्या कोर्टात जाणार असल्याच सांगितलं.
कशी झालेली हत्या?
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.