Nashik Crime | नाशिकमध्ये 11 वर्षांच्या मुलाचे अपहरण, गुंतागुंतीचे नेमके प्रकरण काय?
नाशिकच्या सातपूरमध्ये दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी गुंडांच्या पार्श्वभागावर लाठ्यांचा प्रसाद देत रस्तावरून त्यांची धिंड काढली होती. मात्र, त्यानंतरही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोकाट सुटलेत. त्याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होत असून, पोलिसांनी अधिक आक्रमक होत या गुंडगिरीचा बीमोड करावा, अशी मागणी पुढे येताना दिसत आहे.
नाशिकः नाशिकच्या (Nashik) शांततेला कोणाची नजर लागलीय माहित नाही. मात्र, येथे रोज काही ना काही चक्रावून सोडणारे घडतेय. कधी रस्त्यावर गुंडांचा तलवारी घेऊन हैदोस. कधी भर शहरात पडणारे खून, तर कधी पडणारे दरोडे. आता सातपूर भागात असेच एक प्रकरण उघड झाले आहे. त्यात एका 11 वर्षांच्या मुलाचे अपहरण (Abduction) झाले आहे. विशेष म्हणजे याच सातपूरमध्ये दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी गुंडांच्या पार्श्वभागावर लाठ्यांचा प्रसाद देत रस्तावरून त्यांची धिंड काढली होती. मात्र, त्यानंतरही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोकाट सुटलेत. त्याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होत असून, पोलिसांनी अधिक आक्रमक होत या गुंडगिरीचा बीमोड करावा, अशी मागणी पुढे येताना दिसत आहे. खरेच पोलीस कधी जागे होणार, हे प्रकार कधी थांबणार, हे येणारा काळच सांगेल.
कशी घडली घटना?
सातपूरमधील हिंदी शाळेजवळ राधाकृष्ण नगर येथे श्री दर्शन रो हाऊस आहे. या घरात राहणारा राजाबाबू शंभूशरण शर्मा (वय 11) हा मुलगा दोन दिवसांपू्र्वी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. मात्र, तेव्हापासून तो बेपत्ता आहे. आपल्या मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावली आहे. त्याला पळवून नेले आहे, अशी तक्रार राजाबाबूच्या आई-वडिलांनी केली आहे. त्यामुळे सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक श्याम जाधव यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
घरात पैसे मागितले
दोन दिवसांपूर्वी राजाबाबूने आपल्या घरात येऊन आई-वडिलांना पैसे मागितले होते. मात्र, त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे त्याने आई-वडिलांसोबत भांडण केले. रागाच्या भरातून तो घरातून बाहेर पडला. सांयकाळी सातपर्यंत तो क्रिकेट खेळत होता. मात्र, त्यानंतर बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. राजाबाबूला अज्ञात व्यक्तीने फूस लावली आहे. त्यानेच त्याचे अपहरण केले आहे, असा दावा त्याच्या कुटुंबाने केला आहे. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नेमके हे अपहरण आहे की, मुलगा रागाच्या भरात घरातून निघाला हे तपासात समोर येईल.
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?