‘राजीव गांधी यांच्यासारखं राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ’, पोलिसांना धमकीचा फोन, गृह विभाग अलर्ट
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या धमकीची गंभीर दखल घेतली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नाशिक | 2 मार्च 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे बंगळुरुत नुकतंच एका कॅफेत बॉम्बस्फोट घडल्याची घटना ताजी आहे. असं असताना राहुल गांधी यांना बॉम्ब स्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यासारखं बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी फोन कॉलद्वारे देण्यात आली होती. राहुल गांधी यांच्यावर न्याय जोडो यात्रेदरम्यान बॉम्ब हल्ला केला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. संबंधित वृत्तानंतर सुरक्षा यंत्रणादेखील अलर्ट झाली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांच्या निवासस्थान परिसरात पोलीस सुरक्षा वाढवली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश पोलिसांना राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांना सध्या झेड प्लस सुविधा आहे. त्यांची न्याय जोडो यात्रा येत्या 2 मार्चला मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.
नाशिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन आला होता. पोलिसांना गेल्या आठवड्यात हा फोन आला होता. तेव्हापासून पोलीस अलर्टवर होते. पोलिसांनी तपास करत आरोपींना शोधून काढलं आहे. यावेळी आरोपी हा एक मनोरुग्ण असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आहे. आरोपीने दारुच्या नशेत संबंधित कृत्य केल्याचं उघड झालं आहे.
आरोपीला आठ-दहा वर्षांपासून दारुचं व्यसन
नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील मनोरुग्णाने हा फोन कॉल केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मनोरुग्णाच्या फोननंतर नाशिक पोलीस अलर्ट झाले आहेत. नाशिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आठ दिवसांपूर्वी हा फोन आला होता. “आरोपीला आठ-दहा वर्षांपासून दारु पिण्याचं व्यसन आहे. त्याने दारुच्या नशेत फोन केला होता. या प्रकरणाचा सर्व अहवाल सुरक्षा एजन्सीजला पाठवण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात आहे”, अशी माहिती नाशिकच्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
गृह विभाग अलर्टवर
संबंधित प्रकार समोर आल्यानंतर गृह विभाग अलर्ट झालं. गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. राहुल गांधी यांना जी धमकी देण्यात आली आहे ती कितपत गंभीर आहे, याचा तपास दोन्ही राज्याच्या पोलिसांनी केला. यासाठी स्पेशल सेलला देखील नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर या धमकीमागे एक मनोरुग्ण असल्याचं उघड झालं. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या अवतीभवती सलग 24 तास 10 पेक्षा जास्त एनएसजी कमांडो, पोलीस कर्मचाऱ्यांसह 55 जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.