कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास मागता येईल दाद; पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी नाशिकमध्ये प्राधिकरण
नाशिकमध्ये (Nashik) पोलीस तक्रार प्राधिकरण सुरू करण्यात आले आहे. येथे असे खलप्रवृत्तीचे पोलीस (Police) अधिकारी किंवा पोलिसांविरुद्धच्या तक्रारी नागरिकांना नोंदविता येणार आहेत
नाशिकः अनेकदा कुंपणच शेत खाते, अशी परिस्थिती असते. कायद्याचे रक्षकच अनेकदा कायद्याचे भक्षक होतात. मग त्यांच्याविरोधात दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न असतो. त्यासाठी नाशिकमध्ये (Nashik) पोलीस तक्रार प्राधिकरण सुरू करण्यात आले असून, येथे असे खलप्रवृत्तीचे पोलीस (Police) अधिकारी किंवा पोलिसांविरुद्धच्या तक्रारी नागरिकांना नोंदविता येणार आहेत. (Establishment of Police Authority in Nashik, Ordinary citizens will be able to lodge complaints against police)
पोलिसाची वर्दी मिळाली की, अनेकजण तिचा दुरुपयोग करतात. खंडणी वसुली, हप्ता वसुली, लाचखोरी, महिलांना अपमानास्पद वागणूक, पैशासाठी छळ, खोट्या गुन्ह्यात अडकाविणे असे प्रकार पोलीस अधिकारी आणि पोलिसांकडूनच घडतात. मात्र, सामान्यांना कोणीही वाली नसतो. पोलिसाविरोधात तक्रार द्यायची म्हटले की, पोलीस ठाण्यात नोंद करून घेतली जात नाही. यावर तोडगा म्हणून नाशिक जिल्ह्यात पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि पोलिसांविरुद्धच्या तक्रारी सामान्य नागरिक, पीडित व्यक्ती, पोलीस कर्मचारी ते राष्ट्रीय व मानवी हक्क आयोग अशा कोणालाही करता येणार आहेत. नाशिकसह पाच जिल्ह्यांमध्ये या प्राधिकरणाचे काम चालणार आहे.
असा मिळेल न्याय?
अनेक पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी हे दखलपात्र गुन्ह्यांची नोंद घ्यायला टाळाटाळ करतात. विलंब लावतात. अनेक जण वेगळ्याच गुन्ह्याची नोंद करतात. चुकीच्या पद्धतीने तपास करून तो भरकटवला जातो. अनेकदा कोठडीत मृत्यू होतात, कैद्यांना गंभीर मारहाण केली जाते. स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीची माहिती त्यांच्या कुटुंबांना दिली जात नाही. अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही, या सह इतर प्रकरणांतही पोलीस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात या प्राधिकरणात दाद मागता येणार आहे.
येथे नोंदविता येईल तक्रार
नाशिकमधील काठे गल्ली येथे शहर विभागीय कार्यालयात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालय आहे. या कार्यालयात जाऊन तक्रार करता येईल. अथवा dpca2019@gmail.com या ई मेल आयडीवर तक्रार नोंदविता येईल. किंवा 0253-2594016 येथे फोन करूनही तक्रार नोंदविता येईल. (Establishment of Police Authority in Nashik, Ordinary citizens will be able to lodge complaints against police)
इतर बातम्याः
चंचल वारा, या जलधारा…नाशिकमध्ये ऊन-पावसाचा खेळ…पुढचे दोन दिवस सोहळा!