Nashik Kidnapping : नाशिकमध्ये मुलींची विक्री करणारी टोळी जेरबंद, अपहरण करुन परराज्यात विकायचे
मुलींचे अपहरण करुन 1 लाख 75 हजार रुपयांत त्यांची परराज्यात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 'ऑपरेशन मुस्कान'राबवत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिक : नाशिकमध्ये मुलींचे अपहरण (Kidnapped) करून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळी (Gang)ला ओझर पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान‘ राबवत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या ऑपरेशनद्वारे गुजरात आणि मध्यप्रदेश येथून अल्पवयीन मुलींना पळवून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी 1 लाख 75 हजार रुपयात अपहरण केलेल्या मुलींची परराज्यात विक्री करत असे. या टोळीतील संशयित 3 महिला आणि 2 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयितांकडून नाशिकमधील काही भागांतून मुलींना पळवून नेण्याची कबुली देण्यात आली आहे.
एका अपहरणाचा तपास करताना टोळीचा पर्दाफाश
ओझर पोलीस ठाणे हद्दीत एका मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार ओझर पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरु केला. यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास केला. तपासादरम्यान पोलिसांना या टोळीचा माग लागला. मुलींचे अपहरण करुन 1 लाख 75 हजार रुपयांत त्यांची परराज्यात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’राबवत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी आतापर्यंत किती मुलींचे अपहरण केले आणि त्यांना कुठे कुठे विकले याबाबत आरोपींची चौकशी करत आहेत. (Gang of kidnapping and selling girls arrested in Nashik)