नाशिकमधील कथित पत्रकाराने खरंच इतक्या पैशांची खंडणी मागितली? खळबळजनक घटना

| Updated on: Jun 14, 2023 | 5:47 PM

नाशिकमध्ये एका पत्रकाराने एसीबीची धमकी देवून खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादीने मोठे दावे केले आहेत.

नाशिकमधील कथित पत्रकाराने खरंच इतक्या पैशांची खंडणी मागितली? खळबळजनक घटना
नागपूरच्या सिताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन
Follow us on

नाशिक : पत्रकारिता ही मोठी जबाबदारी आहे. या क्षेत्रातले अनेकजण अहोरात्र मेहनत करतात. ते भर उन्हात, थंडीत, पावसात आपलं कर्तव्य बजावतात. हे कर्तव्य खरंच सोपं नाहीय. विशेष म्हणजे ही एक मोलाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पेलत असताना अनेक पत्रकार अगदी तहान भूक हरपून काम करत असतात, हे वास्तव आहे. पण काही विचित्र घटना चांगल्या पत्रकारांना अस्वस्थ करतात. विशेष म्हणजे अशा घटना पत्रकारितेवर घाणेरडा डाग लावतात. अर्थात त्याचा चांगल्या पत्रकारांवर फार परिणाम होतो, असं नाही. पण सर्वसामान्यांमध्ये चुकीचा मेसेज जरुर जातो. त्यामुळे प्रत्येक पत्रकाराला याचं भान असणं जास्त आवश्यक आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशातील लोकशाही मजबूत टिकवून ठेवण्यात पत्रकारीतेचा चांगला हातभार लाभलेला आहे. त्यामुळेच तर पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. पण असं असलं तरी नाशिकमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका पत्रकाराने एसीबीचा धाक दाखवून वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याची धमकी देत तब्बल 60 हजारांची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कल्पेश लचके (वय 27) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. तसेच या संशयित आरोपीला न्यायलयात हजर केलं असता त्याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (एनडीसीसी बँक) माजी संचालक गणपतराव पाटील (वय 68) यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केलीय. संशयित आरोपी कल्पेश लचके याने गेल्या आठवड्यात गुरुवारी (8 जून) मोबाईलवरुन गणपतराव पाटील यांना फोन केला. यावेळी त्याने “भोई नावाच्या व्यक्तीने एनडीसीसी बँकेत घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार केली आहे. एसीबीकडेही तक्रार करणार आहे. तुमच्या विरोधात बातमी देणार आहे”, अशा शब्दांत धमकावलं.

आरोपीने 60 हजारांची खंडणी घेतली?

संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी तडजोडीचं संभाषण करण्यात आलं. कल्पेश लचके याने पाटील यांना आपल्या स्थानिक वृत्तवाहिनीच्या पोर्टलच्या कार्यालयात बोलावले. यावेळी आरोपीने तब्बल 80 हजार रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचं ठरलं. लचके याने पाटील यांना 60 हजार रुपये देण्यास भाग पाडलं. आरोपीने पाटील यांना आपल्या चार मित्रांना देखील प्रत्येकी 20 हजार रुपये द्यावे, असं सांगितलं.

या सगळ्या घडामोडींनंतर गणपत पाटील यांनी एसीबीकडे अशाप्रकारची तक्रार झालीय का याची चौकशी केली. पण तशी कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी कल्पेश लचकेला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं. त्याला न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झालाय. पण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पत्रकारितेच्या नावाने अशी खंडणी घेतली जात असेल तर आरोपींना शिक्षा होणं जरुरीचं आहे, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.