मोतीलाल अहिरे, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव : चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. नराधमा तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय आहे प्रकरण?
26 वर्षीय आरोपी सावळाराम भानुदास शिंदे हा पीडित बालिकेच्या नात्यातील आहे. खाऊ घेऊन देण्याच्या आमिषाने त्याने चिमुरडीला जवळ बोलावलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.
लेकीला पाहून आईचा आरडाओरडा
अत्याचार केल्यानंतर चिमुरडीला तिच्या आईजवळ सोडून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून आईला शंका आली. त्यानंतर तिने आरडाओरड केली.
पळून जाणाऱ्या आरोपीला पकडलं
आरोपी सावळाराम शिंदे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्याला पकडलं आणि चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. जमावाच्या मारहाणीत आरोपी किरकोळ जखमी देखील झाला आहे.
बालिकेवर उपचार
चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी बालिकेवर अत्याचार झाल्याचे सांगितले. बालिकेला इजा झाल्याने तिला पुढील उपचार करण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून आरोपीला कठोर शासन व्हावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दक्षता समिती सदस्य सोनाली लोखंडे यानी केली आहे.
संबंधित बातम्या :
फेसबुकवर मुलीच्या नावाने अकाऊंट बनवतो, तरुणांशी मैत्री, मग नोकरीच्या बहाण्याने बोलावून मोबाईल पळवतो
नवी मुंबई दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक, तीन फरार आरोपींचा शोध सुरु
खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरला, नागपुरात 78 वर्षीय महिलेची घरात निर्घृण हत्या