इगतपुरीतील लग्नातून नववधूचे सोन्याचे दागिने लंपास, मुंबईत तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

| Updated on: Dec 23, 2021 | 8:27 AM

परिसरातील फोटो शूटींगच्या आधारे तपास सुरु केला असता पोलीस ग्रुपच्या आधाराने आरोपी आणि त्यांचे मोबाईल नंबर सापडले. तपासाची चक्रं वेगाने फिरवत असताना सबंधित आरोपी मुंबईजवळच्या मिरा भाईंदर परीसरात असल्याचे मोबाईल लोकेशन आढळले

इगतपुरीतील लग्नातून नववधूचे सोन्याचे दागिने लंपास, मुंबईत तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
इगतपुरीतील चोरी प्रकरणी कारवाई
Follow us on

शैलेश पुरोहित, टीव्ही9 मराठी, इगतपुरी : नाशकातील लग्न सोहळ्यात नववधूच्या दागिन्यांची बॅग चोरल्याबद्दल मुंबईतून तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तर एक आरोपी हातावर तुरी देऊन पसार झाला. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी शहरातील केपटाऊन व्हिलाज येथे 7 डिसेंबरला लग्न सोहळा सुरु असताना नववधूचे दागिने असलेली बॅग चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

ताराचंद केवलचंद बबेरवाल (रा. घोटी) यांनी चोरी प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे आणि पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी तातडीने शोध पथक नेमून महाराष्ट्र पोलीस ग्रुप व्हॉट्सॲप ग्रुपच्या आधारे चोरांचा शोध सुरु केला.

मिरा भाईंदर परीसरात मोबाईल लोकेशन

परिसरातील फोटो शूटींगच्या आधारे तपास सुरु केला असता पोलीस ग्रुपच्या आधाराने आरोपी आणि त्यांचे मोबाईल नंबर सापडले. तपासाची चक्रं वेगाने फिरवत असताना सबंधित आरोपी मुंबईजवळच्या मिरा भाईंदर परीसरात असल्याचे मोबाईल लोकेशन आढळले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी काशिमीरा पोलिसांना तपासाकामी मदतीला घेत घटनेतील आरोपींना केवळ 48 तासांत ताब्यात घेतले.

यात तीन आरोपी हाती लागले असून एकाने पळ काढला. तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.

5 लाख 60 हजारांचा मुद्देमाल

चोरी झालेल्या सुमारे 6 लाख 11 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 5 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडे सापडला. या घटनेतील आरोपी अतिश अमर ससोदिया, (वय 20 वर्ष, रा. पोस्ट पिपलीया ता. पचौर जिल्हा राजगड, मध्यप्रदेश, निखिल रवि ससोदिया, (वय 19 वर्ष, रा. पिपलीया, मध्यप्रदेश), करण महाविर सिंग, (वय 23 वर्ष, रा. पडकोली पो. पुराकनेरा ता. बहा, जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश) तर चौथा आरोपी विकास सालकराम सिसोदिया फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

अट्टल गुन्हेगारांचा शोध 48 तासांत

इगतपुरी पोलीसांनी केवळ महाराष्ट्र पोलीस व्हॉट्सॲप ग्रुपच्या आधारे अट्टल गुन्हेगारांचा शोध 48 तासांत लावल्याने तालुक्यात आणि जिल्ह्यात इगतपुरी पोलिसांच्या कामगिरीचं अभिनंदन होत आहे. पोलिसांनी या घटनेत अतिदक्षता आणि कर्तबगारी दाखवल्याने नागरिकांनी इगतपुरी पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे आणि पोलीस पथकांचे कौतुक केले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, सहा. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव, पोलीस नाईक मुकेश महिरे, पोलीस कॉ. सचिन बेंडकुळे, राजेंद्र चौधरी, बोराडे, विजय रुद्रे आदि करत आहेत.

संबंधित बातम्या :

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हत्या

तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला म्हणत पतीने पत्नीला भोसकले; घटनेनंतर आरोपी फरार

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण, कोळसेवाडी पोलिसांकडून आरोपीला अटक