माजी महापौरांवर झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर, गोळीबार करुन हल्लेखोर फरार
Malgegaon Crime News: माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला. रविवारी मध्यरात्री अब्दुल मलिक युनूस एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या इसा यांना मालेगावमधील स्थनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची गंभीर परिस्थिती पाहून नाशिकमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मालेगावात बंदोबस्त वाढवला
मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर ज्या भागात गोळीबार झाला, त्या ठिकाणावरुन सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. ते सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. त्यात दुचाकीवरुन आलेले आरोपी धावपळ करताना दिसत आहेत. अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मालेगावात तणावाचे वातावरण आहे. शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मालेगावात माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार…घटनेचे सीसीटीव्ही… pic.twitter.com/Nbuk1k8EKA
— jitendra (@jitendrazavar) May 27, 2024
असा झाला गोळीबार
अब्दुल मलिक युनूस इसा हे हॉटेलमध्ये चहा पित बसले होते. त्यावेळी दोन हल्लेखोर दुचाकीवरुन आले. त्यांच्यावर त्यांनी तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी छातीत घुसली. दुसरी गोळी त्यांच्या पायाला लागली आहे. तसेच तिसरी गोळी त्यांच्या हाताला स्पर्श करुन गेली आहे.
नाशिक रुग्णालयाबाहेर बंदोबस्त
माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. राजकीय सुडापोटी गोळीबार झाल्याची चर्चा सध्या आहे. मालेगाव शहरात दोन दिवसांत दोन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, साहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत करत आरोपींना लवकरच पकडण्यात येणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा
मध्यरात्री गोळीबाराचा थरार, माजी महापौरांवर तीन गोळ्या चालवल्या