चंदन पुजाधिकारी, नाशिक, दि. 20 नोव्हेंबर | सरकारी नोकरीत असलेल्या महिलेने गुन्हेगारीचा कळस गाठला. आधी आजारपण, मुलांचे शिक्षण, शेती अशी कारणे सांगून नाशिकच्या दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक पीठाच्या विश्वस्त निंबा शिरसाट यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर मोबाईलमधील काही व्हिडिओ निंबा शिरसाट यांना दाखवले. त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी रुपये लुटले. महिलेचा हा प्रकार थांबत नव्हता. सोबत महिलाचा मुलगा देखील होता. यामुळे शिरसाट यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर दहा लाखांची खंडणी घेताना आई आणि मुलास रंगेहाथ पकडले. या प्रकरणात कृषी विभागात सहायक असलेल्या सारिका सोनवणे आणि तिचा मुलगा मोहित सोनवणे यांना अटक करण्यात आली आहे.
दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पीठाचे विश्वस्त निंबा शिरसाट आणि सारिका सोनवणे यांची २०१४ मध्ये ओळख झाली. दोघेही नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याचे रहिवाशी आहेत. आजारपण, शेती, मुलांचे शिक्षण अशी कारणे सांगून २०२९ मध्ये सारिका सोनवणे हिने २५ लाख रुपये शिरसाट यांच्याकडून घेतले. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये शिरसाट यांना मोबाइलमधील काही व्हिडिओ दाखवले आणि २० कोटी रुपयांची मागणी केली. वेळोवेळी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्यांनी सारिका सोनवणे यांना दिली.
२०१८-१९ मध्ये सारिका सोनवणे यांनी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांकडूनही लाखो रुपये जमा केले. तसेच शिरसाट यांच्याकडून सातत्याने पैशांची मागणी करत होती. यामुळे त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर सारिका सोनवणे आणि तिचा मुलगा मोहित सोनवणे यांना दहा लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. सारिका सोनवणे निफाड तालुक्यातील पिंप्री येथे बीजगुणन केंद्रात कृषी सहायक आहेत. ४ ऑक्टोबरपासून त्या वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.