आठ लाखांचे लाच प्रकरण, शिक्षणाधिकारी वैशाली झनकरांना जामीन मंजूर, पण कोर्टाच्या अटी-शर्ती
आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर (Vaishali Veer-Zankar) यांचा अखेर जामीन मंजूर झाला आहे.
नाशिक : आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर (Vaishali Veer-Zankar) यांचा अखेर जामीन मंजूर झाला आहे. पण जामीनासाठी कोर्टाने काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. या अटी-शर्तींनुसार आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांना दर सोमवारी नाशिकच्या ACB कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे. न्यायालयाने अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
याआधी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरु आहे. वैशाली यांच्या वकिलांनी 14 ऑगस्टला देखील जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती. याशिवाय ठाणे लाचलुचपत विभागाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला होता.
नेमके प्रकरण काय आहे ?
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलं. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.
अनुदानाला मंजुरीसाठी संस्थेकडे 9 लाखांची मागणी, 8 लाखावर तडजोड
आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झनकर यांना अटक केली होती.
संबंधित बातम्या :
नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी
जामीन फेटाळताच छातीत ‘कळ’, लाच प्रकरणातील आरोपी वैशाली वीर-झनकर रुग्णालयात