Nashik Accident : सीईटीचा क्लास संपवून घरी येताना अपघात! 20 वर्षीय तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ
अपघातात मृत्यू झालेल्या साक्षीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. साक्षी हीनं नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.
नाशिक : संगमनेर (Sangamner) इथून सीईटीचा क्लास संपवून घरी येणाऱ्या तरुणीच्या दुचाकीचा अपघात (Bike Accident) झाला. या एक तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिचा मृत्यू झाला असून इतर दोघीजणी जखमी झाल्यात. शनिवारी दुपारी हा अपघात घडला. नांदूर शिंगोटे तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास इथल्या तीन तरुण विद्यार्थींनी सीईटी क्लासला (CET Class) गेल्या होत्या. क्लास संपवून घरी येत असताना त्यांची दुचाकी एका उभ्या ट्रकला धडकली आणि या अपघातामध्ये एकीचा मृत्यू झाला. या सर्व तरुणीचं वय 20 वर्ष होतं. या अपघातप्रकरणाची नोंद पोलिसांनी करुन घेतली असून स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी तत्काळ बचावकार्यही केलं. नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्र आणि महामार्ग पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केलाय. तरुण विद्यार्थींनीच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
दुर्दैवी मृत्यू
नांदूपशिंगोटेच्या भोजापूर खोरे परिसरातील चास येथील तीन युवती संगमनेर इथून सीईटीचा क्लास संपवून घरी निघाल्या होत्या. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास खंडोबा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर त्यांची भरधाव दुचाकी धडकली आणि भीषण अपघात झाला. MH 15 HL 1419 क्रमांकाची स्कूटी HR 61 D 9843 क्रमांकाच्या ट्रकला धडकली होती.
पाहा व्हिडीओ :
दोघी जखमी
दुचाकीच्या अपघातामध्ये साक्षी अनिल खैरनार या वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तर सविता सूर्यभान सांगळे आणि वर्षा जगपात या दोघीजणी जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमी तरुणींना रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कुटुंबीयांना धक्का
अपघातात मृत्यू झालेल्या साक्षीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. साक्षी हीनं नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. पुढील महाविद्यालयीन परीक्षेसाठी तिनं सीईटीचा क्लास लावला होता. त्यासाठी ती आपल्या अन्य दोन मैत्रिणींसोबत घरी परतत असताना भीषण अपघात झाला.