पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरुन नाशिकमध्ये शिजत होता मोठा कट? दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने एकाला अटक केली आहे. इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना फंडींग केल्याचा आणि त्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी उच्च शिक्षित असून आणि त्याच्या महाराष्ट्रात कंपन्या असल्याची माहिती आहे.
चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक | 24 जानेवारी 2024 : नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडींग करण्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने एकाला अटक केली आहे. इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना फंडींग केल्याचा आणि त्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक करण्यात आली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख (वय ३०) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी उच्च शिक्षित असून आणि त्याच्या महाराष्ट्रात कंपन्या असल्याची माहिती आहे. शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये एटीएसची पथकं रवाना झाली आहेत. आरोपीच्या घराच्या झडतीतून 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि तीन जुने सिमकार्ड हस्तगत करण्यात आलं आहे.
संशयित शेख इसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याचा आरोप आहे. विशेष ATS न्यायालयाने आरोपी शेखला 31 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. ATSच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात प्रथमच अशी घटना उघडकीस आली आहे. राबिया उर्फ उम ओसामा या पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून आरोपीने पैसे पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हुजेफ अब्दुल अजीज शेख याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. पण कोर्टाने त्याला 7 दिवसांची म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेखवर आरोप आहे की, त्याने एका महिलेच्या सांगण्यावरून काही पैसे बँकेच्या माध्यमातून वळते केले. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, तेलंगणा या राज्यात बँक खाते आहेत आणि या राज्यात त्याचा संपर्क दिसतोय. बॅटल ऑफ बाबूस या २०१९ साली आयसिसच्या हल्ल्यात जे लोक दगावले, त्यांच्यावर जे लोक अवलंबून होते, त्यांना पैसे पाठवल्याचा आरोप आहे. या संशयिताच्या महाराष्ट्रात काही कंपन्या आहे. यात agro, product संबंधी कंपन्या आहे. राबिया उर्फ उम ओसामा या पाकिस्तानच्या एका महिलेच्या सांगण्यावरून त्याने हे पैसे पाठवल्याचा आरोप करण्यात आलाय.