Nashik Crime | नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या
सावकार निखिल भावले हा पैसे वसुलीसाठी सतत नीलेशला त्रास द्यायचा. त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नाशिकः नाशिकमध्ये सावकाराच्या (moneylender) जाचाला कंटाळून एका 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नीलेश बाळासाहेब सोनवणे असे मृताचे नाव असून, याप्रकरणी नीलेशची आई आणि भावाने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार देत निखिल भावले या सावकारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भावले हा पैसे वसुलीसाठी नीलेशला सतत त्रास द्यायचा. त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नेमके प्रकरण काय?
सातपूर येथील अशोकनगर भागात नीलेश सोनवणे रहायचा. नीलेशला आर्थिक चणचण होती. त्यामुळे खासगी सावकार निखिल भावले याच्याकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी भावलेने गेल्या कित्येक दिवसांपासून नीलेशमागे तगादा लावला होता. तो त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करायचा. शिवाय अपशब्द उच्चारायचा. यामुळे नीलेश टेन्शनमध्ये होता. मात्र, काही दिवसांपूर्वी सावकार भावले याने नीलेशची दुचाकी ओढून नेली. त्यामुळे नीलेश नैराश्याच्या गर्तेत गेला. त्यामुळे त्याने गळफास घेत आत्महत्या केली. अशी तक्रार नीलेश आई आणि भावाने सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सावकार निखिल भावलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
कायदा कठोर…
बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करुन घेताना हेतूपुरस्पर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास 2 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजार पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
पण अंमलबजावणी नाही
खोट्या नावाने परवाना घेणे, नमूद पत्त्याव्यतिरीक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे या बाबी आढळल्यास पहिल्यांदा गुन्हा केल्यास 1 वर्षापर्यंत कैद किंवा 15 हजार रुपये दंडाची शिक्षा, हाच गुन्हा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर केल्यास 5 वर्षापर्यंत कैद किंवा 50 हजारापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, या कायद्याच्या कचाट्यातून अनेक सावकार सुटतात. त्यामुळे असे बळी जात आहेत.
इतर बातम्याः
Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार