जयपूर : राजस्थानमधील जयपूरमध्ये 30 वर्षीय झोया आसिफ मलिकच्या हत्या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. महाराष्ट्रातून जयपूरला फिरण्यासाठी आलेल्या या तरुणीची जयपूरच्या सांगानेरमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. नाशिकची रहिवासी असलेल्या झोयाचा मारेकरीही महाराष्ट्रातीलच असावा, असा संशय पोलिसांना होता. राजस्थान पोलिसांचे पथक महाराष्ट्रात रवाना झाले. तपासादरम्यान झोयाचा मारेकरी हा तिचा 35 वर्षांचा पती महेश भास्कर ठाकरेच असल्याचं उघड झालं. त्याला नाशिकमधील बोदरी (तालुका बागलाण) येथून अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
जयपूरचे डीसीपी प्रल्हाद सिंग कृष्णय्या यांनी सांगितले की, झोया आसिफ मलिकच्या पतीनेच तिची चाकूने वार करून हत्या केली. 2020 मध्ये झोयाचे नाशिकच्या महेश भास्कर ठाकरे याच्याशी लग्न झाले होते. लग्नाआधीही दोघेही एकमेकांना जवळपास सहा वर्षांपासून ओळखत होते, पण लग्नानंतर काही दिवसांनी झोया पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या साहिलच्या प्रेमात पडली. लग्नानंतर झोया साहिलसोबत वेळ घालवू लागली. याच वेळी झोया नाशिकमधून पतीच्या घरातून बेपत्ता झाल्याने पतीनेही पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पती महेशला माहिती होते की ती आपली मानलेली बहीण कुमकुम उर्फ कामिनी हिच्या सतत संपर्कात राहायची आणि जयपूरला जायची. महेश कामिनीला झोयाबद्दल सतत विचारायचा. झोया दिल्लीत आल्याची माहिती मिळताच तो तिचा पाठलाग करत दिल्लीला पोहोचला. त्यानंतर जेव्हा झोया दिल्लीहून जयपूरला आली तेव्हा तिच्या मागोमाग महेशही जयपूरला आला.
त्या दिवशी काय घडलं
महेशने जयपूरमध्येच चाकू खरेदी केला होता. जयपूरमधील एका निर्जन ठिकाणी तिला गाठून महेशने झोयावर चाकूने हल्ला केला. जयपूरला आल्यानंतर महेश एका गेस्ट हाऊसमध्ये राहत होता आणि हत्येनंतर तो चेक आउट करून 31 मिनिटांत निघून गेला. घटनास्थळी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासले मात्र हत्येवेळी महेशने चेहरा झाकून ठेवला होता. हत्येनंतर काही अंतरावर गेल्यावर त्याने अंगावरील कपडे काढून रस्त्यावर फेकले. मोबाईल लोकेशनच्या आधारे राजस्थान पोलिसांनी नाशिक गाठले आणि महेशला त्याच्या मोबाईल शॉपीतून अटक केली.
संबंधित बातम्या :
आईला शिवीगाळ केल्याचा राग, 21 वर्षीय तरुणाकडून शेजाऱ्याची गळा चिरुन हत्या
पोटच्या मुलीवर वाईट नजर ठेवल्याचा राग, प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत, 15 मिनिटात दगडाने ठेचून दोघा जणांची हत्या