Nashik Accident CCTV : भरधाव स्कॉर्पिओ श्रीकांत साबळेंचा जीव घेऊन गेली! पाहा अपघाताचा थरार
9 डिसेंबरची रात्र, दुचाकीचा प्रवास आणि रस्ता पार करताना घडलेला अनर्थ! काळजाचा ठोका चुकणणारं अपघाताचं CCTV समोर, पाहा
चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी, नाशिक : 9 डिसेंबर रोजी रात्री नाशिक जेलरोड इथं भीषण अपघात झाला. या अपघातात एका भरधाव स्कॉर्पिओ कारने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दूरवर फेकला गेला. तर दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर स्कॉर्पिओ थांबली नाही. तशीच सुसाट वेगाने पुढे निघून गेली. आता या भीषण अपघाताचं अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
नाशिक येथील जेलरोड परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ 9 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला होता. याठिकाणी डिव्हाडयर नसलेल्या भागातून काही दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या लेनला पार करुन रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी हा अपघात घडला.
या अपघातात श्रीकांत विजय साबळे नावाची व्यक्ती लेन क्रॉन करत असताना समोरुन भरधाव वेगानं येणाऱ्या स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की श्रीकांत साबळे हे दुचाकीसह हवेत उडाले आणि दूरवर फेकले गेले. यात त्यांना गंभीर मार लागून ते जखमी झाले.
पाहा व्हिडीओ :
नाशिक : नाशिकच्या जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, अपघाताची संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद, 9 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली अपघाताची घटना, श्रीकांत विजय साबळे असे मृत दुचाकी चालकाचे नाव #NashikNews #Accident #CCTV pic.twitter.com/BIGDEGEgqo
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 11, 2022
अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रीकांत साबळे यांच्या मदतीसाठी स्थानिक तातडीने धावले. मात्र तोपर्यंत भरधाव स्कॉर्पिओ चालक फरार झाला होता. दरम्यान, परिस्थितीचं गांभीर्य ओळखून साबळे यांना स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
साबळे यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. आता पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून फरार स्कॉर्पिओ चालकाचा शोध सुरु आहे.
हाती आलेल्या एका सीसीटीव्हीनंतर पोलिसांनी वाहनाचा नंबर आणि ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र या अपघातामुळे अनेक सवालही उपस्थित झाले आहेत.
अनेकदा हायवेवर डिव्हायडर नसलेल्या भागातून दुचाकीस्वार लेन क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा धोका असतो. समोरुन येणाऱ्या वाहनचालकाला जर वेळीच वेगावर नियंत्रण ठेवता आलं नाही, तर मोठा अनर्थ घडू शकतो, हे या अपघातानं अधोरेखित केलंय.