चातुर्मास करण्यासाठी जात असताना काळाचा घाला; दोन जैन साध्वींचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू

| Updated on: Jun 08, 2023 | 10:54 AM

नाशिकच्या मुंबई-नाशिक महामार्गावर हॉटेल ऑरेंज समोर आज पहाटे 5 वाजता भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जैन साध्वींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कंटेनरची धडक पसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

चातुर्मास करण्यासाठी जात असताना काळाचा घाला; दोन जैन साध्वींचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू
road accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

इगतपुरी : इगतपुरीत अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. चातुर्मास करण्यासाठी नाशिकला निघालेल्या दोन जैन साध्वींवर काळाने घाला घातला. कंटेनर, पिकअप आणि ओमनीच्या झालेल्या विचित्र अपघातात पायी जात असलेल्या दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहे. तसेच या अपघाताचा पंचनामा करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावर हॉटेल ऑरेंज समोर कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वी यांचा मृत्यू झाला. आज पहाटे 5 वाजता ही दुर्देवी घटना घडली. हा अपघात अत्यंत विचित्र होता. कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वींना जोरदार धडक बसली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही साध्वी नाशिकला चातुर्मास करण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.

हे सुद्धा वाचा

पवन नगर येथे जात होत्या

या दोन्ही साध्वी कसारा घाटातून नाशिक येथील पवन नगर येथे जात होत्या. पवन नगरमध्ये चातुर्मासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा अपघात झाला. परम पूज्य सिद्धाकाजी आणि परम पूज्य हर्षाईकाजी महाराज अशी या दोन्ही साध्वींची नावे आहेत.

सांगलीत दोन ट्रकचा भीषण अपघात

दरम्यान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. वड्डी गावाजवळ जिथे सहा जणांचा बळी गेला होता, तिथेच हा अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक जागीच ठार झाला तर क्लीनर अपघातग्रस्त ट्रक खाली अडकला आहे. क्लिनरला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन क्लिनरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यात त्यांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला आहे. तसेच गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

अॅसिड वाहतूक करणारा आणि फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. धडकेनंतर दोन्ही ट्रक सुरक्षा कठडे तोडून शेतात घुसले. त्यामुळे ट्रकचा चक्काचूर झाला आहे. दोन्ही ट्रक कर्नाटक पासिंग असून हा अपघात नेमका समोर समोर झाला की ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला हे मात्र नेमके समजू शकले नाही. अपघात घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स टीम तसेच पोलीस पोचले. अॅसिड वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील बॅरल राष्ट्रीय महामार्गावर पडल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.