घर खरेदी करत वाजतगाजत गृहप्रवेश केला, नंतर समोर आली धक्कादायक बाब, ऐकून मालकाच्या पायाखालची वाळूच सरकली…
घर खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. पण हेच स्वप्न पूर्ण करत असतांना काही काळजी घ्यावी लागते. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशी एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
नाशिक : आयुष्यात आपलं स्वतःचं एक तरी घरं असावं अशी जवळपास प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी मोठे प्रयत्न अनेकजण करीत असतात. हेच घर खरेदी ( Home ) करत असतांना काही बारीक सारिक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असे अनेकजण सांगत असतात. पण अनेकदा इथेच माणूस चुकतो आणि पश्चाताप करण्यापलीकडे हाती काहीही उरत नाही. असाच एक प्रकार नाशिकच्या अंबड येथे घडला आहे. एका व्यक्तीने फ्लॅट ( Flat ) खरेदी केला, मोठ्या दिमाखात गृहप्रवेशही केला. पण नंतर काही दिवसांनी सात-बारा उतारा काढून पहिला तर त्यांना मोठा धक्काच बसला आहे. त्यामुळे थेट न्यायायलात धाव घ्यावी लागली असून फसवणूक ( Fraud ) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे घर खरेदी करत असतांना खबरदारी बाळगा अन्यथा तुमची फसणवुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात नुकताच न्यायालयाच्या आदेशावरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यातील साक्री येथील रहिवासी अशोक विठ्ठल कोठावदे आणि सुनीता अशोक कोठावदे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोठावदे दाम्पत्याचा नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वावरे एम्पायर अपार्टमेंटमध्ये प्लॅट होता. तोच प्लॅट त्यांनी दिनेश रावसाहेब चव्हाण यांना विकला होता. त्यादरम्यान प्लॅट कुठेलही कर्ज नाही असे सांगितले होते, त्यावर कोठावदे यांच्या बोलण्यावर चव्हाण यांनी विश्वास ठेवला होता.
नंतर खरेदी झाल्यानंतर त्या फ्लॅटवर धुळे येथील एका पतसंस्थेचे कर्ज असल्याचे समोर आले. 23 लाखांहून अधिक किंमतीचे कर्ज असल्याचे समोर आले. त्यानंतर चव्हाण यांनी कोठावदे यांना फोन केला आणि विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली.
आपली फसवणूक केल्याची याचिका दाखल करत त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली असून न्यायालयाच्या आदेशावरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे घर घेतांना घरावर बोजा आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय घर घेऊ नका असं सांगण्याची वेळ वारंवार येत आहे.