Nashik भाजी विक्रेत्याचा खून आर्थिक देवाण-घेवाणीतून; पोलिसांच्या अवघ्या 24 तासांत 2 संशयितांना बेड्या
पंचवटी परिसरातील RTO ऑफिससमोर झालेल्या भाजी विक्रेत्याच्या खुनातील 2 संशयितांना अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आर्थिक देवाण-घेवाणीच्या जुन्या वादातून हा खून झाल्याचे समजते.
नाशिकः नाशिकमधील पंचवटी परिसरातील RTO ऑफिससमोर झालेल्या भाजी विक्रेत्याच्या खुनातील 2 संशयितांना अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आर्थिक देवाण-घेवाणीच्या जुन्या वादातून हा खून झाल्याचे समजते. संशयितांमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून खून, दरोड्याच्या घटनेने नाशिक हादरले आहे. वर्चस्वादाच्या प्रकारातून एका पोलीस पत्राचा झालेला खून, दोन दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा झालेला खून. त्यातच एका शेतवस्तीवर पडलेला दरोडा या भयंकर घटनांची मालिकाच सुरू आहे. शिवाय गेल्या आठवड्यात एका चार वर्षांच्या मुलीचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात चोराने तिच्यावर कट्यारीने हल्ला केला होता. या चिमुकलीवर अजूनही उपचार सुरू आहेत. राजेश शिंदे या भाजी विक्रेत्याचा 24 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत तरुण राजू शिंदे फुलेनगरातल्या भराड वाडी येथे राहायचा. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घरी जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी त्याला अडवले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवले. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते.
आर्थिक व्यवहारातून संपवले
राजू शिंदे याचे भाजीपाला विक्रीचे छोटे दुकान होते. यावरचा त्याच्या कुटुंबाचा उर्दरनिर्वाह सुरू होता. वर्चस्ववादाच्या प्रकारातून हा खून झाल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात हा खून जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीतून झाल्याचे समोर येत आहे. या खुनाच्या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपासाची चक्रे फिरवून शिर्डी येथून रवी मधुकर यलमामे आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला बेड्या ठोकल्या आहेत. पैशाच्या देवाण-घेवाणीतून आणि जुन्या भांडणातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.
गुन्हेगार मोकाट
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सध्या फक्त नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती हा एकमेवक विषय लावून धरलेला दिसतोय. त्यातच पोलिसांची इतकी ऊर्जा नष्ट होतेय की, दुसरीकडे गुन्हेगार मोकाट सुटलेत. यांना वेसण घालण्यासाठी आता आयुक्तांनी लक्ष घालावे. एकाच वेळी साऱ्या आघाड्यांवर लक्ष ठेवावे. इतकेच नाही, तर कुठले प्रकरण कुठवर ताणावे आणि कोणती मोहीम जास्त लाभदायक याचाही विचार करावा. एकीकडे शहरात खुनामागून खून होतायत आणि पोलीस भलत्याच कामात गुंतलेले, असे होऊ नये म्हणजे मिळवले, अशी प्रतिक्रिया दक्ष नाशिककरांमध्ये उमटत आहे.
इतर बातम्याः