बाई बंदुकीचा नाद बरा नाही, फोटो काढायला गेली नववधू, थेट रक्ताच्या थारोळ्यात
हातात पिस्तूल असलेला फोटो शेअर केला तर आपला रुबाब पडेल, दहशत माजेल, आपण भाई बनू, असे वेगवेगळे त्यांचे समज-गैरसमज असतात. अर्थात हे फोटो पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांना दंडुक्यांचा प्रसाद मिळाला. उत्तर प्रदेशात तर एका नववधूला हातात बंदूक घेऊन फोटो काढणं प्रचंड महागात पडलं आहे
लखनऊ : आजकाल चित्रपट, वेब सिरिज जिथे बघावं तिथे मारामारी, लटापटी. बंदूक ही जणू सर्वसामान्याच गोष्ट. पण ते खोटं विश्व आहे. ते मनोरंजनासाठी आहे. त्यामुळे ते मनोरंजनापूरतं मर्यादित ठेवणं आवश्यक आहे. पण आजची तरुणाई त्यातून प्रेरित होऊन पिस्तूल बाळगणं म्हणजे एक नवी फॅशन असं त्यांच्या वागण्यातून जाणवतंय. गेल्या काही दिवसात हातात पिस्तूल घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर करणाऱ्या तरुणांचं प्रमाण वाढलं आहे. हातात पिस्तूल असलेला फोटो शेअर केला तर आपला रुबाब पडेल, दहशत माजेल, आपण भाई बनू, असे वेगवेगळे त्यांचे समज-गैरसमज असतात. अर्थात हे फोटो पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांना दंडुक्यांचा प्रसाद मिळाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशात तर एका नववधूला हातात बंदूक घेऊन फोटो काढणं प्रचंड महागात पडलं आहे. या तरुणीला तर थेट जीव गमवावा लागला आहे.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित घटना ही शाहाबाद कोतवाली येथील खत्ताजमालखां भागातील आहे. या भागात वास्तव्यास असलेला तरुण आकाश गुप्ता याचं दोन महिन्यांपूर्वी राधिका नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. सगळं ख्यालीखुशालीने सुरु होतं, असं सासरच्यांचं म्हणणं आहे. तरुणीच्या सासऱ्याची बंदूक घरात होती. या बंदुकीसोबत फोटो काढण्याचा तिला मोह झाला. त्यामुळे दोघं पती-पत्नी फोटोसेशनमध्ये गुंग झाले. यावेळी तरुणीने आपले बंदुकीसोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटोसेशन सुरु असताना घात झाला. पती-पत्नी सेल्फी काढत असताना टिगरचं बटन दाबलं गेलं आणि तरुणीच्या गळ्याच्या आरपार गोळी गेली.
गोळी लागताच क्षणी तरुणी ओरडायला लागली. ती रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडली. यावेळी तिच्यासोबत असलेला पती घाबरला. त्याने तातडीने घरातील इतर सदस्यांना बोलावलं. तरुणीला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात गेल्यानंतर उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं असताना नववधूची अशाप्रकारे एक्झिट होणं ही अतिशय क्लेशदायी घटना असल्याचं परिसरातील नागरिक म्हणत आहेत.
राधिकाच्या माहेरच्या मंडळींचा सासरच्यांवर गंभीर आरोप
या सर्व घटनेची माहिती राधिकाच्या माहेरच्यांना कळली तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण त्यांना संतापही आला. त्यांनी राधिकाच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केला आहे. राधिकाच्या सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा जीव घेतला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. राधिकाचे सासरचे तिच्या पाठीमागे सारखे दोन लाख रुपयांचा तगादा लावत होते. तसेच तिला त्यासाठी त्रासही देत होते. त्यातूनच त्यांनी तिची हत्या केली, असा आरोप माहेरच्यांनी केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतक तरुणीचा पती, सासू-सासरे, मोठे दिर यांच्यासह आणखी काही अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
साताऱ्यासह महाराष्ट्राला पुन्हा डॉ. डेथची का आठवण? नेमकं काय केलं होतं डॉ. संतोष पोळनं?