Santosh Deshmukh Case : सुरेश धस यांनी खंडणी डीलमध्ये नाव घेतलं, तो नितीन बिक्कड अखेर समोर येऊन बोलला
Santosh Deshmukh Case : बीड आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी खंडणी प्रकरणात नितीन बिक्कड या तरुणाच नाव घेतलं होतं. हा नितीन बिक्कड कोण? त्याचा काय संबंध? आता या नितीन बिक्कडने समोर येऊन टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी नितीन बिक्कड याचं नाव घेतलं होतं. खंडणी प्रकरणात डील झाली, तोडपानी झाली तेव्हा धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी नितीन बिक्कड होता असा आरोप होतोय. त्या नितीन बिक्कडने आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना सुरेश धस यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. वाल्मिक कराडशी आपला काहीही संबंध नाही हे नितीन बिक्कडने स्पष्ट केलं. खंडणीच्या प्रकरणात तुम्ही डीलमध्ये होता असा आरोप होतोय. 14 ते 19 जून दरम्यानचा हा सर्व घटनाक्रम आहे या पत्रकाराच्या प्रश्नावर नितीन बिक्कड यांनी उत्तर दिलं.
“ही बातमी खोटी आहे. 14 जूनला मी गावी होतो. 14 जून नंतर दोन-तीन दिवसांनी मुंबईत आलो. त्यानंतर पूर्ण आठवडा मुंबईत होतो. पण वाल्मिक अण्णा कराडशी कुठलाही कॉन्टॅक्ट झाला नाही असं नितीन बिक्कडने सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता, तेव्हा धनंजय मुंडेंना मी भेटायचे असं तो म्हणाला.
नितीन बिक्कड धनंजय मुंडेंना कधी भेटला?
“मी 25 जूनला एका कामानित्ताने धनंजय मुंडे यांना भेटलो होतो. धाराशिवच्या सीईओला फोन करायचा होता. त्या कामासंदर्भात भेटायला गेलो होतो. हा व्हिडिओ आहे, आवाज स्पष्ट ऐकू येतोय. धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्थान आहे. 25 आणि 26 जून असे सलग दोन दिवस मी धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलो होतो” असं नितीन बिक्कडने सांगितलं.
वाल्मिक कराडशी काय संबंध आहे?
धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराडशी काय संबंध आहे? त्यावर नितीन बिक्कडने सांगितलं की, “माझा त्यांच्याशी कसलाही संबंध नाही. माझा कॉल झालेला नाही” “धनंजय मुंडे त्यांच्या निवासस्थानी आहेत का? याची माहिती घेऊन त्यांना भेटायला मी गेलो होतो. माझं काम झाल्यावर मी निघून गेलो” असे बिक्कड म्हणाला.