राजकोट : गुजरातच्या राजकोटमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सीबीआयने दोन दिवसांपूर्वी राजकोटमधील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) संचालकाला अटक केली. जवरीमल बिश्नोई असं या अधिकाऱ्याचं नाव होतं. तो परराष्ट्र व्यापार महासंचालनालयात संयुक्त संचालक पदावर नियुक्त होता. त्याला पाच लाख रुपयांची लाच घेतली म्हणून अटक करण्यात आली होती. मात्र, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना धक्का देत त्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सीबीआयने शुक्रवारी जवरीमल बिश्नोई याला अटक केली. त्यानंतर शनिवारी राजकोट येथील त्याच्या कार्यालय आणि घरावर छापेमारी केली. त्यावेळी जवरीमलने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना धक्का देत चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यामुळे तो ठार झाला. छापेमारीवेळी सीबीआयने जवरीमलच्या घर आणि कार्यालयातून एक कोटी रुपये जप्त केले आहेत.
सीबीआयची टीम जेव्हा बिश्नोईच्या घरी पोहोचली तेव्हा त्याच्या पत्नीने स्वत:ला घरात कोंडून घेतलं होतं. रात्रीच्यावेळी तिने घराच्या छतावरून पैशाने भरलेली एक बॅग पार्किंगमध्ये फेकली होती. ही बॅग तिच्या भाच्याने उचलली होती. अशीच दुसरी कॅशने भरलेली बॅग त्याच्या पत्नीने शेजारच्या घरात पाठवली होती. छतावरून बॅग फेकत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सीबीआयने या दोन्ही बॅगेतून सुमारे एक कोटी रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.
छतावरून उडी मारल्यानंतर बिश्नोई गंभीर जखमी झाले होते. त्यांना बराच मार लागला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जवरीमल पाच लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती, असं डीसीपी सुधीर देसाई यांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बिश्नोई समाज हादरून गेला आहे. बिश्नोई समाजाने रुग्णालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. तर जवरीमल याचा भाऊ संजय गिला यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जवरीमल यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जावं अशी मागणी संजयने केली आहे. या प्रकरणी प्रद्यूमननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर सीबीआयच्या डीआयजी सुप्रिया पाटील या राजकोटला पोहोचल्या आहे. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून या घटनेची माहिती घेतली. तसेच पोलिस अधिकाऱ्यांशीही त्या चर्चा करणार आहेत.
राजस्थानचे आमदार बिहारीलाल बिश्नोई यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिलं आहे. तसेच मुख्यमंत्री भूपेन्द्र पटेल यांनाही पत्र लिहिलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांसमोरच हे प्रकरण घडल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.