मध्यरात्री रस्त्यात वादावादी, वृद्धाकडून तरुणाची हत्या, संशय टाळण्यासाठी रात्रभर मृतदेहाजवळ झोपला
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी पाहिले की रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी होती आणि जवळ एक मृतदेह पडलेला होता. मृतदेहावर चाकूने अनेक वार केल्याचे दिसून आले.
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना राजधानी दिल्लीत उघडकीस आली आहे. त्यानंतर आरोपी रात्रभर मृतदेहाजवळ झोपला होता. खरं तर आरोपी हा दिव्यांग असून कोणाला आपल्यावर संशय येऊ नये, या उद्देशाने तो मृतदेहाजवळ झोपल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र आरोपी फार काळ पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करु शकला नाही.
काय आहे प्रकरण?
दिल्ली पोलिसांना एक जानेवारी रोजी सुभाष नगर परिसरातील सूर्या हॉटेलजवळ एका पुरुषाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी पाहिले की रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी होती आणि जवळ एक मृतदेह पडलेला होता. मृतदेहावर चाकूने अनेक वार केल्याचे दिसून आले.
सिगरेट घ्यायला गेल्यावेळी वाद
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला. मयत व्यक्तीचे नाव चंदन असून तो सुभाष नगर परिसरात राहतो, अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली. चंदन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी त्याच्या दोन मित्रांसह राजौरी गार्डनमधील अन्सल प्लाझा मॉलमध्ये आला होता. त्याच्या मित्रांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सूर्या हॉटेलच्या बाहेरील दुकानात चंदन सिगारेट घेण्यासाठी गेला होता.
त्या रात्री चंदनची भेट रस्त्यावर भीक मागणार्या 65 वर्षीय वृद्ध दिव्यांगाशी झाली होती, असे स्थानिक माहितगारांकडून समजले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन आणि संतोष दोघेही दारुच्या नशेत होते. दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरुन वाद झाला असावा आणि त्याचे रुपांतर मारामारीत झाले.
दिव्यांग वृद्धासोबत तरुणाची हाणामारी
दरम्यान, विनोद नावाचा 20 वर्षीय तरुणही स्कूटीने घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सांगितले की, विनोद हा दिव्यांग संतोषची काळजी घेतो. विनोदला पाहताच संतोष त्याच्याकडे गेला. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चंदनने संतोषला शिवीगाळ करणे सुरुच ठेवले आणि मारहाणही केली. त्यानंतर विनोद आणि संतोष यांची चंदनसोबत हाणामारी झाली. अखेर विनोद आणि संतोष यांनी चंदनवर चाकूने हल्ला केला.
चाकूचे वार झाल्यामुळे चंदनचा जागीच मृत्यू झाला. आरोपी विनोद ताबडतोब स्कूटी घेऊन त्याच्या घरी गेला, मात्र दिव्यांग संतोष रात्रभर मृतदेहासोबत पडून होता. दोन कारणांमुळे पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही असे त्याला वाटले, एक म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या अशक्त आहे आणि दुसरा तो घटनास्थळावरून पळून जाऊ शकत नाही. मात्र संतोषची शक्कल पोलिसांसमोर चालली नाही आणि खुनाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी संतोष आणि विनोदला अटक केली असून हत्येत वापरलेला चाकू जप्त केला आहे.
संबंधित बातम्या :
Car Accident| टायर फुटून कार टँकरवर आदळली; दीड वर्षाच्या नातीसह आजीने सोडले प्राण
नवरत्न जडवलेली सोन्याची बांगडी महिलेने पळवली, चोराची चपळाई एवढी की रात्री हिशेब करतानाच…
जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला