राऊत यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी, गुन्हा दाखल
राजकारणात सक्रीय असणारे राऊत यांना एक कोटी खंडणी द्या असा धमकीचा फोन आलाय. किशोर अंबावकर या व्यक्तीच्या मोबाईलवरून हा फोन आलाय. एक कोटीची खंडणी द्या नाही तर तुमच्यामागे मुंबई पोलिसांचा ससेमिरा लावू अशी धमकीही त्यांना देण्यात आलीय.
विरार : 3 ऑक्टोबर 2023 | 2000 पासून विरार पूर्व मनवेलपाडा विभागातून प्रकाश राऊत हे नगरसेवक म्हणून सलग निवडून आले आहेत. 2019 ते 20 या कालावधीत ते वसई विरार महापालिकेचे स्थायी समिती सभापती होते. सर्वसामान्य जनतेत त्यांची लोकप्रियता आहे. पक्ष आणि विकासकामांच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रभागात प्रसिद्ध आहेत. राऊत हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
प्रकाश राऊत यांना खंडणीसाठी एक फोन आला. एक कोटीची खंडणी द्या नाही तर तुमच्यामागे मुंबई पोलिसांचा ससेमिरा लावू अशी धमकीही त्यांना ऑडिओ क्लिपद्वारे देण्यात आलीय. किशोर अंबावकर या व्यक्तीच्या मोबाईलवरून हा फोन करण्यात आला होता.
खंडणी मागणाऱ्या तरुणांनी ‘तुम्ही धंदेवाईक तरुणांच्या नावाने ऑर्डर काढली. किती अनधिकृत इमारती बांधल्या आहेत? अशी विचारणा या ऑडिओ क्लिपमध्ये केली आहे. प्रशांत राऊत तुम्ही 1 कोटी रुपये बाजूच्या बडोदा बँकेजवळ आणून द्या अन्यथा तुमच्या मागे क्राईम ब्रँच, मुंबई पोलिसांचा ससेमिरा लावू अशी धमकीही दिलीय.
प्रशांत राऊत यांनी याबाबत विरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे 4 जणांना अटक केली आहे. प्रतिक कृष्णा भोईर (वय 24), मनीष वसंत गायकवाड (वय 25), भावेश आत्माराम गवाले (वय 23), अमर मोहन शिर्के (वय 29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी हे विरार, वाडा या परिसरातील राहणारे आहेत. वसई, विरार परिसरात एकहाती सत्ता असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या सभापतीकडेच खंडणीची मागणी झाली. त्यामुळे वसई विरार क्षेत्रातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.