जागेचा वाद टोकाला गेला, पुतण्याच्या हल्ल्यात काका गंभीर जखमी तर चुलत भावाचा मृत्यू
शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या स्मशानभुमीसमोर पाली कुटुंबीय वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारी त्या ठिकाणी बोअरवेलचे काम सुरू होते.
यवतमाळ : जागेच्या वादातून पुतण्याने काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास शहरातील पांढरकवडा मार्गावर घडली आहे. या हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाला तर काका गंभीर जखमी आहे. राहुल पाली 27 वर्षीय मयत भावाचे नाव आहे. तर नरेंद्र पाली असे 50 वर्षीय गंभीर जखमी काकाचे नाव आहे. तर सूरज पाली असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. नविन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात तिसऱ्या खुनाच्या घटनेची नोंद झाली आहे.
पुतण्याचा काका आणि चुलत भावासोबत वाद झाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या स्मशानभुमीसमोर पाली कुटुंबीय वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारी त्या ठिकाणी बोअरवेलचे काम सुरू होते. अशात संशयित सूरज पाली याचा काका नरेंद्र, चुलत भाऊ राहुल याच्यासोबत चांगलाच वाद झाला.
वादाचे हाणामारीत रुपांतर झाले
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात सूरज याने चक्क लोखंडी रॉडने काका नरेंद्र आणि चुलत भाऊ राहुल याच्यावर प्राणघातक हल्ला केला. चढविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात दोघेही खाली पडले होते.
उपचारादरम्यान चुलत भावाचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान राहुल पाली याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर गंभीर जखमी असलेल्या नरेंद्र पाली यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हत्या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश असल्याचा संशय
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्या प्रकरणात संशयित सूरज पाली याच्यासह दोन ते तीन जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.
राहुल पाली हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांची नावे पोलिसांसमोर आली आहे. त्यावरून शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम मारेकऱ्यांच्या शोधात रवाना करण्यात आली आहे.