बागायतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घरी बोलावलं, नंतर कथित पतीची एन्ट्री, अहमदनगरमध्ये पुन्हा हनी ट्रॅप
अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हनी ट्रॅपच्या घटनेने हादरला आहे. वडगाव गुप्ता परिसरात राहणार्या एका तरूणीने अन्य दोघांच्या साथीने पाथर्डी तालुक्यातील एका बागायतदाराला अडकविल्याचे उघड झालं आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हनी ट्रॅपच्या घटनेने हादरला आहे. वडगाव गुप्ता परिसरात राहणार्या एका तरूणीने अन्य दोघांच्या साथीने पाथर्डी तालुक्यातील एका बागायतदाराला अडकविल्याचे उघड झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका महिलेसह तरुणाला ताब्यात घेतलं आहे. बागायतदाराने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी 2 लाख रुपये दिले. नंतर आपली फसवणूक झाली, असं त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी करणे सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
आरोपी तरुणी ही वडगाव गुप्ता परिसरात वास्तव्यास होती. या तरुणीने बायगायतदाराशी फोनवर बोलून मैत्री केली. तिने फोनवर बोलून बागायतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणीने बागायतदाराला घरी बोलावलं. यावेळी ती घरात एकटीच होती. थोड्यावेळाने तरुणीचा कथित पती घरी आला. त्याने बागायतदाराला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्याची भीती दाखवली. त्यावेळी त्याने बागायतदाराकडून पाच हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील दुसऱ्या एका व्यक्तीच्या मध्यस्थीने दोन लाखांचे तीन चेक घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं बागायतदाराच्या लक्षात आलं. त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित घटनाही ही 15 आणि 16 जून दरम्यान घडल्याची माहिती तक्रारदार बागायतदाराने दिली आहे.
बागायतदाराच्या तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली. त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईस सुरुवात केली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी तपास सुरू केला. अखेर याप्रकरणी एका महिलेसह तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नगरमध्ये क्लास वन अधिकाऱ्यासोबत हनी ट्रॅप प्रकरण
अहमदनगरमध्ये दोन महिन्यांपूर्वी क्लास वन अधिकाऱ्यासोबत हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस आलं होतं. अहमदनगरमधील जखणगाव येथे उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ तयार करुन तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं उघडकीस आलं होतं. या प्रकरणी अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात एक महिला आणि 4 पुरुष अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बिझनेसमनच्या हनी ट्रॅपचाही भांडाफोड
नुकतंच एका श्रीमंत व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून, त्याचा अश्लील व्हिडिओ काढण्यात आला होता. व्यावसायिकाकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदाराला नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केलं होतं. अमोल सुरेश मोरे असे अटक केलेल्या सदर महिलेच्या साथीदाराचे नाव आहे.
आरोपींनी जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल हिसकावला
आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराने पीडित व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्याकडील 5 तोळे वजनाची सोन्याची चेन, चार अंगठ्या आणि 84 हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली होती. महिला आणि तिच्या साथीदाराने आतापर्यंत एकूण 5 लाख 44 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला होता. या प्रकरणी तालुका पोलीस पुढील तपास करत आहे. (Ahmednagar Officer Honey Trap )
हनी ट्रॅप म्हणजे काय?
एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. (विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवण्यात आलं होतं. हाही पुराणातला ‘हनी ट्रॅप’च) गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘हनी ट्रॅप’ खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.
संबंधित बातम्या :
भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा कट, हनी ट्रॅपने आरोपीला छोटा काश्मिरात बोलावलं, पण…
आधी सेक्स चॅट, मग न्यूड व्हिडीओ कॉल, ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्यापासून सावध रहा