अहमदनगरमध्ये खळबळ! कोपरगाव शहरात प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार, जखमी तरुणाला नाशिकला हलवलं
अहमदनगरच्या कोपरगाव शहरात प्रचंड वर्दळ असणाऱ्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ संबंधित गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तन्वीर बालम रंगरेज असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी तन्वीरला उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संबंधित घटना ही आज संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.
कोपरगाव शहरात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आरोपीने थेट कारवर गोळीबार केला. या कारमधील तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पण गोळीबार करणारा आरोपी कोण आहे? तसेच त्याचा उद्देश नेमका काय होता? ते अद्याप समजू शकलेलं नाही.
पोलिसांपुढे मोठं आव्हान
दरम्यान, या घटनेनंतर आता पोलिसांपुढे गोळीबार करणाऱ्या युवकला शोधण्याचं मोठं आव्हान आहे. आरोपीने नेमका गोळीबार कशासाठी केला आणि कोणी केला? याबाबतच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून तपासाला सुरुवात झाली आहे. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिसांकडूव सुरु करण्यात आला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस कदाचित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर गोष्टी तपासण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकार आहे पूर्व वैमनस्यातून झालाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.