Osmanabad Crime : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नितीन बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार! जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले
Osmanabad Nitin Bikkad Firing : जीवघेण्या हल्ल्यातून नितीन बिक्कड हे थोडक्यात बचावले आहेत.
उस्मानाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Osmanabad) जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बिक्कड (Nitin Bikkad Attack) यांच्यावर जीवघेणा हल्ला (Attempt to murder) करण्यात आला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञातांनी नितीन बिक्कड यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या यावेळी बंदुकीतून झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी गाडीवर लागली. हल्ल्यातून बालंबाल बचावल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला आणि हल्लेखोर कोण होते? याची माहिती मिळू शकलेली नाही. वाशी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. आता पोलिसांकडून या गोळीबारप्रकरणी अधिक तपास केला जातोय.
नेमका हल्ला कुठे झाला?
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. बिक्कड यांच्या गाडीवर 2 गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यातील एक गोळी ही गाडीच्या समोरच्या काचेवर मध्यभागी लागली होती.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यातून नितीन बिक्कड हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरूप असून आता हा हल्ला नेमका का करण्यात आला होता, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसंच गोळीबार करण्यासाठी आलेले अज्ञात हल्लेखोर कोण होते, याचीही ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
पारा-फक्राबाद रोडवर बिक्कड त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला. जीवघेण्या हल्ल्यानंतर गुन्हा नोंद करण्याची कारवाई वाशी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. हल्ला करण्याचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून आता अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे.