‘सर आम्हाला वाचवा….’ पेट्रोल बॉम्ब, शूट ॲट साइट, मदरसा तोडण्यावरुन हिंसाचार, 2 ठार, 139 जखमी
Haldwani Violence | हल्द्वानीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. कर्फ्यू लावण्यात आला आहे. हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर पोलीस जखमी झालेत. समाजकंटकांनी 7 पेक्षा अधिक मीडियाच्या गाड्या पेटवून दिल्या.
Haldwani Violence | बेकायद मदरसा आणि नमाज स्थळ तोडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस पोहोचले होते. कारवाई सुरु करण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी पुढे सरकताच पोलिसांवर तिन्ही बाजूंनी दगडफेक सुरु झाली. पोलीस कर्मचारी कसाबसा आपला जीव वाचवून तिथून निसटले. प्रत्येक गल्ली आणि छपरावरुन पोलिसांवर दगडफेक झाली. गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बनभूलपुरा पोलीस ठाण्यात 600 पेक्षा जास्त पोलीस एकत्र जमले होते. उत्तराखंडच्या हल्द्वानी शहरात बेकायद मदरसा आणि नमाज स्थळ तोडण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी पोहोचले होते.
त्यावेळी समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ सुद्धा झाली. बनभूलपुरा पोलीस स्टेशन समाजकंटकांनी पेटवून दिलं. जमावाने परिसरातील गाड्या पेटवून दिल्या. नैनीतालच्या डीएम वंदना सिंह यांनी माहिती दिली की, या हिंसाचारात 2 लोकांचा मृत्यू झाला असून 139 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. समाजकंटकांनी चारही बाजूंनी पोलिसांवर दगडफेक केली. यात 50 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. हिंसाचारात पत्रकार आणि नगर पालिकेचे कर्मचारी सुद्धा जखमी झाले. हिंसाचारानंतर परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे.
पट्रोल बॉम्ब फेकून पोलीस स्टेशन पेटवलं
पोलिसांनी हिंसक जमावाचा नेटाने सामना केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण शेकडोंच्या संख्येने असलेल्या समाजकंटकांनी दगडफेक करुन पोलीस स्टेशन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पट्रोल बॉम्ब फेकून पोलीस स्टेशन पेटवून दिलं. पोलीस ठाण्याची भिंत तोडून आरोपी आत घुसले त्यांनी एसओच कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात घुसलेल्या समाजकंटकांच्या हातात पेट्रोलच्या बॉटल होत्या.
महिला पोलीस अडकलेल्या
समाजकंटकांनी पोलीस स्टेशन बाहेर उभी असलेली पोलिसांची वाहन आणि बाइक पेटवून दिल्या. 20 पेक्षा जास्त बाइक जाळल्या. पोलीस स्टेशनच्या आत आणि बाहेर तोडफोड केली. पोलीस अधीक्षक हरीश चंद्र वर्मासह 40 जवान पोलीस स्टेशनच्या आत अडकले होते. यात बहुतांश महिला पोलीस होत्या.
‘सर आम्हाला वाचवा….’
हल्ल्याच्यावेळी महिला शिपाई वायरलेस सेटवरुन घटनेची माहिती उच्चाधिकाऱ्यांना देत होत्या. ‘सर आम्हाला वाचवा….’ असं बोलत असताना लाइन कट झाली. आरोपींनी पोलिस आणि प्रेस लिहिलेली वाहन तोडली, पेटवून दिली.
एकातासात बाजार बंद
बनभूलपुरा क्षेत्रातील वाढता तणाव पाहून मुख्य बाजारातील सर्व दुकान संध्याकाळी सात वाजता बंद झाली. एकातासात सगळा बाजार बंद झाला. यामुळे दहशतीच वातावरण तयार झालं. सर्वप्रथम व्यापाऱ्यांनी कारखाना बाजार, सराफा बाजार, भाजी मार्केट, कपडा बाजार बंद केला. त्यानंतर नैनीताल रोड व बरेली रोडची दुकानं बंद झाली.