झटपट दर्शन आणि स्वस्तात रुम मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, शिर्डी पोलिसांचा कारवाईचा बडगा
शिर्डीत येणाऱ्या साईभक्ताची स्वस्तात रुम देण्याच्या झटपट दर्शन देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले होते. याला चाप लावण्यासाठी शिर्डी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
शिर्डी : झटपट दर्शनासह स्वस्तात रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या 20 ते 25 दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिर्डीत प्रवेश करताच हे दलाल दुचाकीवरून साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करतात आणि विविध आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. भाविकांनी नकार दिल्यास अनेकदा दलाल लोकांनी त्यांना शिवीगाळ किंवा धक्काबुक्की केल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशी कारवाई पुढे देखील सुरूच राहाणार असून भाविकांनी भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन शिर्डी पोलिसांनी केलं आहे.
दलालांना चाप लावण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात
शिर्डी पोलिसांकडून अनेकदा दलालांवर कारवाई करण्यात येते. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने काही दिवसातच पुन्हा भाविकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू होतात. आता शिर्डी पोलिसांनी भाविकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या दलालांना चाप लावण्यासाठी एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात केलं आहे. आज दुचाकीवरून साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करणाऱ्या 20 ते 25 दलालांना ताब्यात घेत शिर्डी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.