गुटखा किंग राजन गुप्ताला अटक, शिवसेना पदाधिकारी असल्यानं खळबळ
मुंबई एपीएमसी मार्केटमधील गुटखा किंग शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई : मुंबई एपीएमसी मार्केटमधील गुटखा किंग शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. अन्न औषध प्रशासन विभागाकडून एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये 5 पान टपऱ्या सील करण्यात आल्यात. त्यामध्ये बंदी असणाऱ्या विविध प्रकारचा गुटखा सापडला. या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने 4 जणांना ताब्यात घेऊन एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये मुख्य सूत्रधार गुटखा किंग राजन गुप्ता उर्फ मुन्ना कित्येक वर्षांपासून गुटख्याचं व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे गुटखा किंग शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने खळबळ उडाली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय (Police action against Shivsena leader Rajan Gupta in Gutkha Case).
पोलीस कोठडीत असणारा राजन गुप्ता उर्फ मुन्ना शिवसेना उत्तर भारतीय विभाग बेलापूर विधानसभा उपशहर संघटक पदावर आहे. याशिवाय तो खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, नवी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बरोबर अनेक मंचांवर उपस्थित असल्याचंही पाहायला मिळालंय. तसेच एपीएमसी व नवी मुंबई परिसरात शिवसेनेकडून लावण्यात येणाऱ्या फलकांवर या गुटखा किंगला मोठ्या रुबाबाचं स्थान देण्यात येतं.
मार्केटमध्ये दररोज जवळपास 20 गोणी गुटखा विक्री
आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उप्तन्न बाजार समितीमध्ये पाचही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते. संपूर्ण नवी मुंबईत जेवढा गुटखा विकला जात नाही, तेवढा गुटखा एपीएमसी परिसरात विकला जात असल्याचे सांगण्यात येतं. मार्केटमध्ये जवळपास 20 गोणी गुटखा दिवसाला विकला जात असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट हे जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी आहे की अमली पदार्थ विक्रीसाठी असा सवाल नागरिक करत आहेत. त्यामुळे आता बाजार परिसरात फक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉललाच परवागनी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलीय.
शिवसेनेच्या आशीर्वादानेच गुटखा विक्री?
खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून मार्केट परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्या उदघाटन सोहळा प्रसंगी शिवसेना उत्तर भारतीय विभाग बेलापूर विधानसभेच्यावतीने खासदार राजन विचारे यांचा सत्कार करण्यात आला होता. शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्या वाढदिवसानिमित्त मार्केट परिसरात फलक लावण्यात आले होते. राजन गुप्ता उर्फ मुन्ना या दोन्ही ठिकाणी दिसत असल्याने शिवसेनेच्या आशीर्वादानेच ही गुटखा विक्री होते आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पान टपऱ्यांवर पाणी आणि बिस्कीट विकण्याच्या नावाखाली खुलेआम गुटखा विक्री
मार्केटमध्ये बाजारसमिती विकास शाखेकडून वाटप करण्यात आलेल्या पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विकला जात आहे. एपीएमसी पोलीस व अन्न औषधी प्रशासन विभागाकडून वारंवार एपीएमसी प्रशासनाला पत्र देउन सुद्धा त्यावर कारवाई केली जात नव्हती. ठाकरे सरकारने गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतल्याने गेल्या काही दिवसात एपीएमसी पोलीस व अन्न औषधे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाचही मार्केटमध्ये काही टपऱ्यांवर गुटखा विक्री होत असल्याचे आढळून आले होते. याबाबत लेखी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांनी बाजार समितीला दिली होती. यावेळी गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्यांना सील करण्यात आले होते. परंतू बाजार समिती प्रशासनाने पुन्हा या टपऱ्या उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे या पान टपऱ्यांवर उघडपणे पाणी आणि बिस्कीट विकण्याच्या नावाखाली खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे.
3 महिन्यात अमली आणि नशेली पदार्थ विक्री आणि साठा प्रकरणी 38 कारवाया
ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत दीड कोटी रकमेचा गुटखा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला होता. मागील 3 महिन्यात अमली आणि नशेली पदार्थ विक्री आणि साठा प्रकरणी 38 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातील 30 कारवाया गुटखा वाहतूक, विक्री आणि साठ्याप्रकरणी करण्यात आल्यात. या प्रकरणात 65 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखा अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. शेखर पाटील यांनी दिली. नुकतेच गुटखा विक्री प्रकरणी फळ आणि भाजीपाला मार्केट मिळून 6 गाळे सील करण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधार अटकेत असताना देखील संपूर्ण मार्केटमध्ये गुटखा विक्री मात्र जोरात सुरु असल्याने गुटखा विक्री बाजारसमितीच्या आशीर्वादाने तर चालू नाहीना अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
फ्रुट मार्केट 38, भाजीपाला मार्केट 30, धान्य मार्केट 22, कांदा बटाटा मार्केट 10 आणि मसाला मार्केट 23 अशा एकूण 123 पान टपऱ्यांचे वाटप बाजार समितीने केले आहे. यातील जवळपास १०० पान टपऱ्यांमध्ये गुटखा विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. त्यामुळे गुटखा विक्रीचा हॉटस्पॉट म्हणून एपीएमसी मार्केटची नवीन ओळख निर्माण झालीय. या प्रकरणी एपीएमसी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत अवैधरित्या गुटखा वाहतूक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला, पाठलाग करुन पकडलेला आरोपी निघाला पुणे पोलिसातील हवालदार!
व्हिडीओ पाहा :