कर्ज (Debt) मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची खाती रिकामी करणार्या टोळीचा दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यातील सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खतरनाक गोष्ट म्हणजे या टोळीचे जाळे चीनपर्यंत पसरले असल्याची धक्कादायक माहिती देखील पुढे आलीयं. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फसवणूक केलेल्या रकमेतून बिटकॉइन्स (Bitcoins) खरेदी करायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 एटीएम कार्ड, 7 मोबाईल फोन, 27 सिमकार्ड, लॅपटॉप, टॅबलेट आणि अनेक चेकबुक जप्त केले आहेत. याशिवाय पोलिसांना आरोपींकडून एक बीएमडब्ल्यू कारही सापडली आहे.
माहितीनुसार, मोहम्मद नदीम सैफी नावाच्या व्यक्तीने रोहिणी जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांना एक मेसेज आला होता, ज्यामध्ये त्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज पास झाल्याचे लिहिले होते, ते मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक ओपन केली आणि नदीमने लिंक डाउनलोड करून त्यात दिलेला फॉर्म भरला. यानंतर एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून नदीमला व्हॉट्सअॅप कॉल आला. त्यामध्ये नदीमला एकूण कर्जाच्या रकमेच्या पाच टक्के रक्कम खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले.
तीन व्यवहारांत नदीमने एका खात्यात 40 हजार रुपये जमा केले. त्यानंतर कोणतेही उत्तर न मिळाल्याने नदीमला आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. नदीमच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता सर्व पैसे मध्य प्रदेशातील नीमच येथील एका बँक खात्यात गेल्याचे आढळून आले. त्या खात्यात अवघ्या 2 दिवसांत 75 लाख रुपये जमा झाले. या फसव्या रकमेतून क्रिप्टोकरन्सी आणि अमेरिकन डॉलर्स खरेदी केले जात होते.
राजस्थानच्या चित्तोडगड परिसरातून ही टोळी काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चित्तोडगड येथे छापा टाकून दीपक पटवा, सुनील कुमार, देवकिशन आणि सुरेश सिंग यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी ही कल्पना यूट्यूबवरून घेतल्याचे उघड केले. यानंतर तो टेलिग्रामवर काही चिनी नागरिकांच्या संपर्कात आला. हे लोक ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करायचे. दीड टक्के कमिशन देऊन बँक खाती काढायची. ते फसवणूक केलेली रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करायचे.