कल्याण (ठाणे) : भर रस्त्यात कॅब चालकाला थांबवून त्याला लुबाळणाऱ्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आदील शेख आणि मुजाहिद लांजेकर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी आधी कॅब थांबवली. त्यानंतर गाडीत शिरताच त्यांनी चाकूचा धाक दाखवत कॅब चालकाकडून दोन मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतला. या आरोपींनी याआधी किती लोकांची लूट केली याचा तपास पोलीस करीत आहेत (Police arrest two accused who looted cab driver in Kalyan).
नेमकं प्रकरण काय?
अॅन्टॉप हिल परिसरात राहणारे मुन्वर हुसेन शेख कॅब चालक आहेत. 13 एप्रिलच्या रात्री मुन्वर हुसेन शेख हे एका प्रवाशाला सोडण्यासाठी डोंबिवलीस आले होते. प्रवाशाला सोडून ते कल्याणच्या दिशेने निघाले. पत्रीपूल ते गोविंदवाडी बायपास या रस्त्याने जात असताना फानूस ढाब्याच्या शेजारी उभे असलेल्या दोन जणांनी शेख यांची कार थांबिवली. चाकूचा धाक दाखवून शेख यांच्या जवळ असलेली रोकड आणि दोन मोबाईल हिसकावून घेतले.
पोलिसांची गाडी आल्याने जेरबंद
दोघी चोरट्यांना आणखीन पैसे पाहिजे होते. त्यामुळे त्यांनी शेख यांना गाडी कल्याण स्टेशनच्या दिशेने घेण्यास सांगितली. तिथे जाऊन शेख यांनी एटीएममधून पैसे द्यावेत, अशी त्यांची मागणी होती. शेख यांनी भीतीपोटी गाडी स्टेशनच्या दिशेला घेतली. संचारबंदी असल्याने रात्रीच्या वेळी पोलीसांची पेट्रोलिंग सुरू होती. पोलिसांची एक गाडी शेख यांना समोरून येताना दिसली. त्यांनी पोलीस गाडी समोर येताच हॅण्ड ब्रेक दाबला. त्यानंतर ते लगेच गाडीतून खाली उतरले. समोर येणारे पोलिसही गाडीतून खाली उतरले.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले
पोलिसांनी शेख यांच्या सांगण्यानुसार गाडीतील दोघांना ताब्यात घेतले. आदील शेख (वय 27) आणि मुजाहिद लांबेकर (वय 30) अशी या दोघांची नावे असून त्यांनी लूटीच्या इराद्याने हा प्रकार केला होता. आरोपींनी शेख यांना एटीएमधून पैसे दिले नसते तर त्याची गाडी घेण्याची धमकी या दोघांनी दिली होती.
आरोपींवर अनेक गुन्हे दाखल
वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की, या दोघांपैकी एकाच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहे. या दोघांनी मिळून किती लोकांना लूटले त्याचा पोलीस तपास करीत आहेत. पानसरे यांनी ज्या पोलिसांनी कामगिरी केली आहे. त्यांचे कौतूक केले आहे.
हेही वाचा : बार, आठवडी बाजार सर्रासपणे सुरु, कल्याणमध्ये नियमांचे तीन तेरा, भाजप आमदाराकडून महाविकास आघाडीवर निशाणा