लखनऊ : आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती बातमी नेमकी कशी सांगावी हेच कळत नाही. कारण संबंधित घटनाच प्रचंड संवेदनशील आणि वाईट आहे. एक महिला बाळाला जन्म देते. पण जन्मानंतर लगेच त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर महिलेचे कुटुंबिय त्या बाळाचं अंत्यविधी करुन त्याचा मृतदेह दफन करतात. मात्र, दोन दिवसांनी त्या बाळाचा वडील कोण हे शोधण्यासाठी प्रशासनाचे आदेश येतात. मृत बाळाची डीएनए टेस्ट करण्यासाठी दफन केलेल्या बाळाचा मृतदेह बाहेर काढायचा. त्यानंतर त्याला शवविच्छेदनासाठी पाठवायचं, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून येतो. या आदेशानुसार प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. मात्र, ही घटना फक्त एवढ्या पुरता मर्यादित नाही. या घटनेला काहीसा वाईट, विचित्र, प्रचंड संवेदनशील आणि मन पिळवटून टाकणारा, असा इतिहास आहे.
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका महिलेवर गावातील एका नराधमाने बलात्कार केला होता. त्यानंतर महिला गर्भवती झाली होती. महिलेने आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र, आरोपीने महिलेचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, पीडितेने 25 मे रोजी बाळाला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबियांनी बाळाला जमिनीत दफन करुन अंत्यविधी केले. मात्र, पीडितेने आणि तिच्या कुटुंबियांनी याबाबत प्रशासनाला काहीच माहिती दिली नाही. बाळाचा मृतदेह दफन केल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळते.
पोलीस ठाण्याचे प्रमुख बीएन सिंह यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हाधिकारी मार्कण्डेय शाही यांना पत्र पाठवून मृतक बाळाचं मृतदेह जमिनीतून बाहेर काढून त्याची डिएनए टेस्ट करण्यासाठी अनुमती मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच त्यासाठी अनुमती दिली. त्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थित मृतदेह बाहेर काढण्यात आलं आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.
पोलिसांची प्रतिक्रिया
अपर पोलीस अधिक्षक शिवराज यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. “संबंधित बलात्काराची घटना ही गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी महिलेने आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेची मेडिकल चाचणी केली असता ती गर्भवती असल्याची माहिती समोर आली होती. आरोपीच्या बलात्कारातूनच पोटात गर्भ राहिल्याचा दावा महिलेने केला होता. त्यानंतर महिलेने 25 मे रोजी एका नवजात बालकाला जन्म दिला. मात्र, दुर्देवाने जन्मानंतर त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबियांनी प्रशासनाला याबाबत कल्पना न देताच मुलाच्या मृतदेहाचा अंत्यविधी केला. पण दुसरीकडे आरोपीने सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मृतक बालकाचे डीएनए तपासले जाणार आहेत. याशिवाय आरोपी हा खरंच गुन्हेगार आहे का की दुसरा कुणी गुन्हेगार आहे हे देखील यातून समजणार आहे”, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : मोठ्या जल्लोषात लग्न केलं, महिन्याभरात 15 लाखांचे दागिने घेऊन नवरी बॉयफ्रेंडसोबत फरार, सीसीटीव्हीत घटना कैद