Breaking : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू, तुरुंगात मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
आकाश गौड असं मृत्यू झालेल्या कैद्याचं नाव होतं. हत्येच्या आरोपाखाली तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. आकाश गौड याला कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा मृत्यू (Prisoner death) झाल्याची घटना समोर आली आहे. आकाश गौड असं मृत्यू झालेल्या कैद्याचं नाव होतं. हत्येच्या आरोपाखाली तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) शिक्षा भोगत होता. आकाश गौड याला कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post mortem) नेण्यात आला आहे. आकाशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. शवविच्छेदन कक्षासमोर मृतकाचे नातेवाईक आणि परिचितांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मार्च 2022 मध्येही कारागृहातील दोन कैद्यांचा मृत्यू
14 मार्च रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबुराव पंच आणि नरेंद्र राजेश वाहने या दोन कैद्यांचा अकस्मात मृत्यू झाला. 59 वर्षीय बाबुराव पंच अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तर 39 वर्षीय नरेंद्र राजेश वाहने एक कोटी 64 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी होता. दोन्ही कैद्यांच्या मृत्यू प्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र एका मागून एक दोघा कैद्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
कोण होते कैदी?
बाबुराव पंच याने नागपूरच्या कोतवाली परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याला कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कोर्टाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
2018 पासून बाबुराव नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 23 फेब्रुवारीला त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.