सोलापूर : तीन वर्षांपूर्वीच्या फसवणूक प्रकरणात माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane) पुन्हा संकटात सापडल्या आहेत. त्यांनी दीड कोटी रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा आरोप असून त्यांना अटक करा, अशी मागणी फिर्यादीने केली आहे. यासाठी या प्रकरणातील फिर्यादीने टेभुर्णी पोलीस ठाण्यासमोर आज ठिय्या आंदोलन (Protest) करीत उपोषण केले. त्यामुळे निवेदिता माने यांच्यावर कारवाईची टांगती तलवार येण्याची शक्यता आहे.
माजी खासदार निवेदिता माने या शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री आहेत. निवेदिता माने यांच्यावर 1 कोटी 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या फसवणुकीची तक्रार तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये करण्यात आली होती. त्या आधारे पोलिसांनी निवेदिता माने यांच्यासह इतर पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निवेदिता माने व इतर आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तीन वर्षे झाली. मात्र पोलिसांनी अजून त्यांना अटक केलेली नाही. पोलिसांच्या या उदासीनतेवर फिर्यादी बबन केचे यांनी बोट ठेवले.
याचवेळी त्यांनी पोलिसांच्या सुस्त कारभाराच्या निषेधार्थ टेभुर्णी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करुन उपोषण केले. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस खात्याकडून पुन्हा कार्यवाहीला गती मिळण्याची चिन्हे आहेत.
मी तीन वर्षांपूर्वी तक्रार दाखल करूनही पोलीस पुढील कारवाईला दिरंगाई का करताहेत? अटकेची कारवाई आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यास चालढकल का केली जात आहे? तक्रार धूळखात का पडलेय? असे सवाल फिर्यादी बबन केचे यांनी उपस्थित केले.
तसेच उपोषण करून आपल्या मागणीकडे पोलीस खात्याचे लक्ष वेधले. आपल्या तक्रारीवर कार्यवाहीची मागणी करीत ते पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडून बसले.
फिर्यादी बबन केचे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी निवेदिता माने यांच्याकडे अनेकदा पैसे मागितले. त्यासाठी ते कोल्हापूरलाही गेले. मात्र त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले गेले नाही.
आपल्या मागणीकडे निवेदिता माने यांनी वेळोवेळी दुर्लक्षच केले, असा दावा बबन केचे यांनी केला आहे. माने यांनी फसवणुक केलेली रक्कम व्याजासकट द्यावी, यासाठी मी माझा लढा सुरुच ठेवणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
निवेदिता माने व इतरांनी संगनमत करुन 2009 मध्ये उजनी जलाशयातील गाळ व रेती उचलण्याच्या ठेक्याची स्थगिती उठवली होती. त्यावेळी तो ठेका पुढील 15 वर्ष राहावा म्हणून 1 कोटी 55 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे केचे यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे.