Yogesh Tilekar : मामाचं दिवसाढवळ्या अपहरण नंतर हत्या का झाली? आमदार योगेश टिळेकर बोलले
Yogesh Tilekar : आमदाराच्या मामाच अपहरण करुन नंतर हत्या झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत असं होतं असेल, तर सर्वसामान्यांच काय? असा प्रश्न यातून निर्माण होतो.
पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भरदिवसा अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण अपहरण आणि हत्या झालेली व्यक्ती साधीसुधी नाहीय. भाजप आमदाराशी त्याचं जवळच नातं आहे. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ ( वय 55) हे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले असताना आरोपींनी त्यांचं अपहरण केलं. पुण्यातील हडपसर भागातील शेवाळेवाडी चौकातून चार ते पाच लोकांनी सतीश वाघ यांना गाडीत जबरदस्ती बसवून त्यांचं अपहरण केलं होतं. काल संध्याकाळच्या सुमारास पुण्यातील निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह सापडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
अपहरण स्थळापासून 40 किलोमीटर अंतरावर सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या बऱ्याच खुणा होत्या, असं पोलिसांनी सांगितलं. पोस्टमॉर्टम करण्याठी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वाघ यांचं अपहरण आणि हत्या नेमकी कोणी, का केली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध आहे. अपहरण आणि हत्या झालेली व्यक्ती भाजप आमदाराची नातेवाईक आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
योगेश टिळेकर काय म्हणाले?
मामाच अपहरण करुन नंतर हत्या करण्यात आली. त्यावर आता स्वत: योगेश टिळेकर बोलले आहेत. “काल या जागेवरून सकाळी अपहरण झालं आणि खून झाला. पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करतेय. लवकर पोलीस याचा सुगवा लावतील. आमच्यासाठी मोठा धक्का आहे” असं योगेश टिळेकर म्हणाले. “पोलीस आरोपीना शोधून काढतील. काही तासामध्ये सुगवा लावतील. आमदाराचा मामा असेल तरी याच राजकारण करू नये. पोलिसांवर आमची कोणतीही शंका नाही. सरकार चांगलं काम करतेय. सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झालीय” असं योगेश टिळेकर म्हणाले.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण स्वाभाविक
पुण्यात दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या माणसाच अपहरण करुन नंतर त्याती अशी हत्या होत असेल, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण स्वाभाविक आहे. पुण्यात अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रीय आहेत. त्यांच्यात जमिनीसह अनेक वादाची प्रकरण आहेत.