Pune Youth Attack : पुण्यात जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला, गिऱ्हाईकावरुन सुरु झाला होता वाद
मंगळवार पेठेत वाघमारे आणि तौसिफ, शाहिद शेख यांची ताडपत्रीची दुकाने आहेत. ताडपत्री खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक कुणाकडून ताडपत्री खरेदी करणार यासाठी हा वाद सुरु झाला होता.
पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : आठ महिन्यांपूर्वी गिऱ्हाईकावरुन झालेल्या वादा (Dispute)तून तिघांनी तलवारीने एका तरुणावर हल्ला (Attack) केल्याची घटना पुण्यातील मंगळवार पेठेत शनिवारी सकाळी घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. द्रोण सुनील मोरे (23, रा. मंगळवार पेठ) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तौसिफ, शाहिद शेख अशी आरोपींची नावे असून त्यांचा अन्य एक साथीदार आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
मंगळवार पेठेत वाघमारे आणि तौसिफ, शाहिद शेख यांची ताडपत्रीची दुकाने आहेत. ताडपत्री खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक कुणाकडून ताडपत्री खरेदी करणार यासाठी हा वाद सुरु झाला होता. ग्राहकाच्या कारणावरुन वाघमारे याची तौसिफ, शाहिद शेख यांच्यासमवेत भांडणे झाली होती. याचाच राग तौसिफ आणि शाहिद शेख यांच्या मनात होता. हाच राग मनात धरुन या दोघांनी आपल्या एका साथीदारासह मिळून वाघमारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघमारे तेथून पळून जाण्यास यशस्वी झाले आणि त्यांच्यासोबत असलेला द्रोण मोरे हा आरोपींच्या तावडीत सापडला.
लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तलवारीने वार केले
वाघमारे आणि फिर्यादी द्रोण मोरे हे दोघेजण शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेत उभे होते. त्यावेळी तौसिफ, शाहिद आणि त्यांचा एक साथीदार असे तिघेजण तेथे तलवारी घेऊन आले. ते वाघमारेचा शोध घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी आणि वाघमारे यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी दोघांचाही पाठलाग सुरू केला. त्यावेळी वाघमारे हा तेथून निसटला, तर आरोपींनी फिर्यादी यास मंगळवार पेठेतील गणेश मंदिरासमोर गाठले. तेथे त्यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तलवारीने वार केले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा झाला आहे. (A youth was attacked with a sword due to an old dispute in Pune)