पुण्यात खळबळ, ललित पाटील याच्यानंतर ससूनमधून आणखी एक आरोपी पळला
Pune Sassoon hospital | पुणे ससून रुग्णालयातून कैदी ललित पाटील फरार झाला होता. या प्रकाराची पुनरावृत्ती पुन्हा झाली आहे. रविवारी अजून एक आरोपी ससून रुग्णालयातून फरार झाला आहे. गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी पसार झाला आहे.
प्रदीप कापसे, पुणे, दि. 11 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरात पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ससून रुग्णालयातून ड्रग्स माफिया ललित पाटील फरार झाला होता. त्या प्रकरणावरुन दहा पेक्षा जास्त पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. हा प्रकार अजून शांत झाला नसताना पुन्हा एक आरोपी ससून रुग्णालयातून फरार झाला आहे. गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी पसार झाला आहे. पोलिसांना गुंगारा देऊन ससून हॉस्पिटलमधून त्याने पळ काढला आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. यामुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
येरवडा कारागृहातून आणले अन् संधी साधली
मार्शल लुईस लीलाकर याला शरद मोहळ याच्या पत्नीला धमकी दिल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने जेलमध्ये प्रकृती खराब असल्याची तक्रार केली. यामुळे त्याला ससून हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. परंतु तो संधी साधत फरार झाला. यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांनी ८ पथके रवाना
ड्रग्स माफिया ललित पाटील फरार काही महिन्यांपूर्वी ससूनमधून फरार झाला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी कारवाई सुरु केली होती. दहापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते. तसेच या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती तयार केली. आता पुन्हा मार्शल लुईस लीलाकर झाला आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी ८ पथके रवाना केली आहे.
ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससूनमधून फरार झाल्यानंतर ससूनचा वॉर्ड क्रमांक १६ हा चांगलाच चर्चेत आला होता. अनेक महिने पैशांच्या जोरावर आरोप तळ ठोकून याठिकाणी राहत होते. आता पुन्हा आरोपी फरार झाल्यामुळे ससून प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.