पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येने मान खाली, राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजितदादांचा संताप
बिबवेवाडीतील कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा बिबवेवाडीतून त्यांना ताब्यात घेण्यात आलं, मात्र मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार आहेत.
पुणे : “पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे” अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
बिबवेवाडीतील कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा बिबवेवाडीतून त्यांना ताब्यात घेण्यात आलं, मात्र मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार आहेत. आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या टीम तयार आहेत.
“…हीच खरी श्रद्धांजली ठरेल”
शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
“त्यांचं कृत्य हे राक्षसी”
पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.
शीर धडापासून वेगळं करण्याचा प्रयत्न
आरोपी हा अत्यंत रागामध्ये अल्पवयीन मुलीकडे आला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. मात्र आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार केल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा मानस या आरोपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे.
हत्येचे नेमके कारण अस्पष्ट
ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
भयंकर ! पुण्यात आठवीच्या मुलीची हत्या, तो वार करत होता तेव्हा लहान मुलं खेळत होती, मोठे घाबरुन पळाले