Pune Firing : पुण्यात गुन्हेगारी थांबता थांबेना; कोयता गँग, तोडफोड गँगनंतर आता हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
पुणे जिल्ह्यातील मावळमधील चांदखेड गावचे ग्रामदैवत संत रामजी बाबा यांची यात्रा सुरु आहे. या यात्रेत आरोपी अविनाश गुठे हा गेला होता. यावेळी यात्रेत हवेत गोळीबार करत आरोपीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
मावळ,पुणे : पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. कोयता गँगची दहशत कमी होत नाही तोच वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रिय झाली. आता हे कमी होते की काय म्हणून मावळ परिसरात यात्रेत हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अविनाश गोठे असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अविनाश गोठेंसह पाच जणांवर हत्येचा प्रयत्न आणि आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदखेडच्या ग्रामदेवताच्या यात्रेत घडली घटना
पुणे जिल्ह्यातील मावळमधील चांदखेड गावचे ग्रामदैवत संत रामजी बाबा यांची यात्रा सुरु आहे. या यात्रेत आरोपी अविनाश गुठे हा गेला होता. यावेळी यात्रेत हवेत गोळीबार करत आरोपीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
आरोपीचा आमदार सुनील शेळकेंसोबत फोटो व्हायरल
अविनाश हा राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियनचा अध्यक्ष असल्याचं नमूद असलेला एक फोटो समोर आला आहे. मावळ राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नियुक्ती पत्र दिल्याचं फोटोत दिसत आहे. तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय म्हणाले आमदार सुनील शेळके?
अविनाश हा माझ्या पक्षातील आहे. पण, त्याची मावळच्या माथाडी कामगार युनियन अध्यक्षपदी मी निवड केलेली नाही. अनेक कार्यकर्ते येऊन माझ्यासोबत फोटो काढत असतात. अविनाशनेही तसाच फोटो काढलेला आहे असं स्पष्टीकरण आमदार सुनील शेळके यांनी दिलं आहे.
कोयता गँगच्या मुख्य सूत्रधाराचा साथीदार अटकेत
पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगचा मुख्य सूत्रधार बिट्टया कुचेकर याचा साथीदार आकाश कांबळेला अटक स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आकाश कांबळेकडून 9 कोयते जप्त केले आहेत. स्वारगेट पोलिसांनी कोयता गँग विरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.