pimpri – chinchawad crime | सामान उधार देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या ग्राहकांनी केले असे काही … ,घटना CCTV मध्ये कैद
बेकारी मालकाने सामान उधार देत नसल्याचे ठामपणे सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी बेकारीच्या मालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
पिंपरी – सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पिंपरी -चिंचवड (pimpri – chinchawad) शहर क्राईमचे हॉटस्पॉट (crime hotspot) ठरत आहे. गुन्ह्याची अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. काळेवाडी परिसरात बेकरी मालकाने सामान उधार देण्यास नकार दिल्याने, संतापलेल्या ग्राहकाने मित्रांच्या मदतीने बेकरीची तोडफोड केली आहे. न्यू रॉयल बेकरीमध्ये ही घटना घडली आहे. घटनेच्या वेळी आरोपी संकेत चौधरी, कृष्णा सोनवणे, रोहित ऊर्फ डॉग, शेखर उर्फ बाब्या, सिद्धांत शिंदे ग्राहक बेकरीमध्ये खरेदी करण्यासाठी आले. वस्तूंची खरेदी करताना आरोपींनी बेकरी मालकाला वस्तू उधार मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी बेकरी मालकाने सामान उधार देत नसल्याचे ठामपणे सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी बेकरीच्या मालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
हल्ला करत केली तोडफोड
बेकरीतील सामानाची तोडफोड करत मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानात उपस्थित असलेल्या महिलांनी आरोपीला हुसकावून लावण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर आरोपींनी दुकानाच्या बाहेर येऊन मालकाला शिवीगाळ करत, जोरदार दगड फेक करण्यास सुरुवात केली. आरोपींनी अचानकपणे केलेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या बेकरी मालकाने पोलीस स्थानक फोन केला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. तोपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते.
याप्रकरणी बेकरी मालक असद अखतर अन्सारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भा.द.वि. कलम 323,143,147,148,504,427 आर्म अॅक्टनुसार आरोपी संकेत चौधरी, कृष्णा सोनवणे, रोहित ऊर्फ डॉग, शेखर उर्फ बाब्या, सिद्धांत शिंदे यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. तोडफोडीची सर्व घटना बेकरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्हीतील दृश्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा: पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपने 14 जागा जिंकल्या, काँग्रेसचा पराभव, शिवसेना-राष्ट्रवादीही विजयी
पुण्यात सरकारची डोकेदुखी वाढली, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचेही ‘भीक मागो’ आंदोलन
परिवहन मंत्र्यांच्या हमीनंतर पुण्यातून खासगी बसेसची वाहतूक सुरू