पुण्यातील बुधवार पेठेत जुन्या वादातून दोन गट भिडले, घटना सीसीटीव्हीत कैद
हाणामारीची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही हाणामारीची घटना घडली.
पुणे : जुन्या वादातून पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हाणामारीची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही हाणामारीची घटना घडली. मात्र अद्याप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नाही.
हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बुधवार पेठेतील क्रांती चौकात दोन गट आपसात भिडल्याचे दिसत आहेत. हातात कोयते घेऊन दोन गट एकमेकांवर वार करत होते.
वादाचे कारण अद्याप कळू शकले नाही
घटनेत किती जण जखमी झाले, याबाबत अद्याप माहिती कळू शकले नाही. तसेच ही घटना नेमकी कोणत्या वादातून घडली याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दोन दिवसापूर्वी मार्केट यार्ड परिसरात गोळीबार आणि लूट
दोन दिवसापूर्वी पुण्यात मार्केट यार्ड परिसरात गोळीबाराची घटना घडली. कुरिअर कार्यालयात एक राऊंड फायर करत 28 लाखांची रोकड टोळक्याने लंपास केली.
या घटनांवरुन पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसाठी मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सांगवी फाट्याजवळ दोन बसचा समोरासमोर अपघात
पुण्यात सांगवी फाट्याजवळ एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन पीमपी बसेसचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. सांगवी फाट्याजवळील पुलावर ही अपघाताची घटना घडली.
अपघातात वाहन चालक गंभीर जखमी तर 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.