Pune Crime News | भाजप नेत्याकडून बिल्डरला मारहाण, सीसीटीव्ही समोर आल्यानंतर…
Pune Crime News | पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेत्याने एका बिल्डरला जबर मारहाण केली. मनपाच्या आवारात झालेल्या या मारहाणीचे फुटेज आल्यानंतर भाजपसमोर अडचण वाढली आहे. यामुळे आता आमदार महेश लांडगे यांनी...
रणजित जाधव, पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने बिल्डरला मारहाण केल्याची ही घटना आहे. या घटनेनंतर पटेल समाज आक्रमक झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारात ही घटना घडली आहे. यानंतर उद्योजक आणि बिल्डरांबरोबर पटेल समाजातून संताप व्यक्त होत आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असल्याचे लक्षात येताच आमदार महेश लांडगे पुढे आले आहे. त्यांनी पटेल समाजाची माफी मागितली आहे.
काय आहे प्रकरण
दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आणि भाजप नेते नितीन बोऱ्हाडे यांच्यासंदर्भातील हे प्रकरण आहे. नितीन बोऱ्हाडे यांनी जमिनीच्या व्यवहारातील वादातून बिल्डर नरेश पटेल यांना जबर मारहाण केली. पिंपरी चिंचवड मनपाच्या आवारातच पटेल यांना लाथाबुक्क्यांनी सर्वांसमोर मारहाण झाली. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर पटेल समाज आक्रमक झाला आहे.
काय आहे वाद
नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते अन नरेश पटेल यांची जमीन शेजारीशेजारी आहे. त्या जागेतून जाणाऱ्या डीपी मार्गावरून वाद आहे. त्यावर सुनावणी पिंपरी चिंचवड मनपात झाली. त्या सुनावणीनंतर बोऱ्हाडे यांनी पटेल यांना मारहाण केली.
आमदार महेश लांडगे यांनी घेतला पुढाकार
नितीन बोऱ्हाडे यांनी केलेल्या या प्रकारामुळे पटेल समाज तसेच उद्योग जगात नाराजी निर्माण झाली आहे. नितीन बोऱ्हाडे हे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत. यामुळे महेश लांडगे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या सर्व प्रकारामुळे आमदार लांडगे यांनी पटेल समाजाची माफी मागितली. त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
वाद मिटवणार – लांडगे
नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांची आपण बैठक घेणार आहे. या बैठकीतून हा वाद सामोपचाराने मिटवला जाईल. यापुढे असे प्रकार होणार नाही, याची आपण स्वत: काळजी घेऊ, असे आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.