मुंबई पोलिसांच्या चौकशीनंतर नामांकित बिल्डर परांजपे बंधूंची अखेर सूटका, कौटुंबिक कलह उघड
परांजपे कुटुंबातील सदस्य आणि कंपनीचे संचालक अमित परांजपे यांनी एक व्हिडीओ जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे (Dispute in Pune famous Builder Paranjape brothers family over property issue).
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे या परांजपे बंधुंची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. याबाबत परांजपे कुटुंबातील सदस्य आणि कंपनीचे संचालक अमित परांजपे यांनी एक व्हिडीओ जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे (Dispute in Pune famous Builder Paranjape brothers family over property issue).
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याबद्दल तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. याबाबत वसुंधरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली होती.
वसुंधरा डोंगरे यांच्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम 476, 467, 68, 406, 420 आणि 120 ब अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. तक्रारदार या वारस असतानाही त्यांच्या कोणतीही माहिती न देता जमिनीची विक्री करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर वसुंधरा डोंगरे यांनी रितसर पोलिसात तक्रार केली होती (Dispute in Pune famous Builder Paranjape brothers family over property issue).
परांजपे बंधूंकडून नेमकं स्पष्टीकरण काय?
“परांजपे कुटुंबियांच्या मिळकतीतील हिस्स्यावरुन कुटुंबातीलच एका व्यक्तीने गैरसमजुतीतून विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भात श्रीकांत, शशांक तसेच त्यांच्या काही चुलत भावंडांनादेखील त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी मुंबई येथे बोलावण्यात आले होते. तक्रारदार व्यक्तीखेरीज परांजपे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत”, अशी भूमिका अमित परांजपे यांनी मांडली.
‘या प्रकरणाचा कंपनी आणि व्यवसायाशी संबंध नाही’
“या प्रकरणी कुणासही अटक केली नसल्याचा खुलासा पोलिसांनी अगोदरच केला आहे. संबंधित विषय हा संपूर्णत: कौटुंबिक मिळकतीतील हिस्सेदारी बाबतचा आहे. या प्रकरणाचा परांजपे स्किम्स या कंपनीशी आणि व्यवसायाशी काहीही संबंध नाही. माझे वडील शशांक परांजपे आणि काका श्रीकांत परांजपे यांची प्राथमिक चौकशीनंतर पुण्यात परतले आहेत”, असं अमित परांजपे यांनी सांगितलं आहे. अमित परांजपे हे परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेडचे संचालक आहेत.
संबंधित बातमी : पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधू पोलिसांच्या ताब्यात, वृद्धेच्या तक्रारीनंतर गुन्हा