पोलीस असल्याचं भासवलं, एसटी थांबवली, दमदाटी करत चौघांना खाली उतरलं, सिनेस्टाईल 1 कोटी रुपये पळवले
पुणे-सोलापूर महामार्गावर काही नराधमांनी एसटी बस अडवून प्रवाशांचे तब्बल 1 कोटी 12 लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे.
दौंड (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर काही नराधमांनी एसटी बस अडवून प्रवाशांचे तब्बल 1 कोटी 12 लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यांनी पोलीस असल्याचं भासवून महामार्गावर एसटीला थांबवलं. त्यानंतर एसटीतील चार जणांना त्यांच्या बॅगसह खाली उतारलं. नंतर प्रवाशांच्या बॅगेतील 1 कोटी 10 लाख रोख रुपये दुचाकीवरुन पळवून नेले.
चोरट्यांनी कट आखत लुटलं
संबंधित घटना ही पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस जवळ घडली. निलंगा ते भिवंडी असा या एसटीचा मार्ग होता. या एसटीत कुरियर सर्व्हिस करणारे चौघेजण प्रवास करत होते. त्यांच्याकडे 1 कोटी 10 लाख रुपये रोख रक्कम आणि इतर वस्तू होत्या. याची खबर चोरट्यांना लागली. त्यांनी अगदी चित्रपटांमध्ये दाखवतात असा कट रचला. त्यांनी पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि पुणे-सोलापूर महामार्गावर एसटीला अडवलं.
चोरटे पैसे घेऊन पसार
महामार्गावर एसटीसमोर अचानक पोलीस उभे राहिल्याने चालकाने ब्रेक दाबत गाडी थांबवली. तोतया पोलिसांनी एसटीमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी काही प्रवाशांना धमकावत दम दिला. यादरम्यान त्यांनी धमकावून कुरिअर सर्व्हिस करणाऱ्या चौघांना एसटीखाली उतरवले. त्यांच्याकडून पैसे आणि ऐवज घेतला. त्यानंतर दुचाकीवरुन पसार झाले. हा सगळा प्रकार मंगळवारी (3 ऑगस्ट) पहाटेच्या वेळी दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी घडला.
पोलिसांचा तपास सुरु
कुरिअर सर्व्हिस करणाऱ्या चौघांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर पीडितांच्या सांगण्यानुसार स्केच तयार केलं आहे. संबंधित स्केच पोलिसांकडून जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणी यवत पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा :
शेताच्या बांधावर खोदकाम, अचानक वाद उफाळला, दोन शेतकरी आमनेसामने, थेट गोळीबार, लातूरमधील भयानक घटना
‘कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार’ म्हणत पिस्तूल हातात घेऊन व्हिडीओ, पोलीस शिपायाचं अखेर निलंबन