प्रेयसीच्या लग्नानंतर तिचा पती ‘नकोसा’ झाला, हत्येसाठी क्राईम पेट्रोल पाहिला, पण त्यातील पोलिसांना विसरला
अक्षयच्या पत्नीचे विवाहापूर्वी संतोष शिंदे याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र अक्षयशी विवाह झाल्यानंतर तिने संतोषशी संबंध तोडले. पुण्यातील लोणी काळभोर भागात अक्षय पत्नीसोबत वास्तव्यास होता.
पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : लग्नानंतर प्रेयसी दुरावल्याच्या रागातून एका तरुणाने प्रेयसीच्या नवऱ्याचाच काटा काढल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. क्राईम पेट्रोल (Crime Petrol) पाहून आरोपीने हत्येचा कट रचला आणि दृश्यम (Drushyam) स्टाईलने अंमलात आणला. मात्र अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अक्षय भिसे असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो महापालिकेत कचरावेचक म्हणून कामाला होता. तर संतोष शिंदे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
लग्नानंतर प्रेयसी टाळत होती
अक्षयच्या पत्नीचे विवाहापूर्वी संतोष शिंदे याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र अक्षयशी विवाह झाल्यानंतर तिने संतोषशी संबंध तोडले. पुण्यातील लोणी काळभोर भागात अक्षय पत्नीसोबत वास्तव्यास होता. लग्नानंतर प्रेयसी संतोषला टाळू लागली होती. तसेच त्याचे फोनही घेत नव्हती. यामुळे संतोष संतापला होता.
क्राईम पेट्रोल पाहून थंड डोक्याने कट रचला
संतापलेल्या संतोषने जर अक्षय या जगात नाही राहिला तर ती आपलीच होईल असा विचार केला आणि अक्षयची हत्या केली. यासाठी आरोपीने दृश्यं सिनेमासारखी शक्कल लढवली. कर्नाटकातील बिदर राज्यात राहणाऱ्या संतोषने पुण्यात राहणाऱ्या अक्षयला मारण्यासाठी थंड डोक्याने कट रचला. यासाठी त्याने क्राइम पेट्रोल यासारख्या मालिका देखील पाहिल्या.
कामावर जात असताना गोळ्या घातल्या
अनेक शक्कल लढवत आरोपीने अखेर हत्येचा कट रचला. हत्येबाबात आपल्यावर शंका येणार नाही याची पुरेपूर काळजीही घेतली. यासाठी तिनदा कपडेही बदलले. 21 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता अक्षय कामावर जाण्यासाठी निघाला असताना दुचाकीवरून पाठलाग करत त्याला गोळ्या घातल्या.
सीसीटीव्हीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक तपास करत पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता हत्येचा उलगडा झाला. (Girlfriends husband killed by youth in Pune)